स्वत:च्या घरातील कार्य समजून सहभागी व्हा
By Admin | Updated: September 12, 2016 00:27 IST2016-09-12T00:21:01+5:302016-09-12T00:27:22+5:30
राजाभाऊ वाजे : मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत आजी-माजी आमदारांचा सहभाग

स्वत:च्या घरातील कार्य समजून सहभागी व्हा
सिन्नर : नाशिक येथे शनिवार, दि. २४ रोजी काढण्यात येणारा मोर्चा म्हणजे स्वत:च्या घरातील कार्य समजून प्रत्येकाने स्वत:हून सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
सिन्नर येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यासाठी तालुक्यातील मराठा समाजबांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार वाजे बोलत होते. आपण सर्वजण मराठा समाजाचे घटक असल्याने कोणीही लहान-मोठा असा विचार करू नये. प्रत्येकाने मनापासून या मोर्चात सहभागी व्हावे. आर्थिक नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात यावे, अशी सूचनाही आमदार वाजे यांनी केली. प्रत्येकाने मोर्चाला जाण्याचे नियोजन करावे. या मोर्चात प्रत्येकाने घरातील महिलांचा सहभाग वाढवावा व मोर्चात सर्वांनी शिस्त पाळावी, असे आवाहन वाजे यांनी केले. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी मोर्चाच्या नियोजनाची माहिती दिली. यावेळी दिव्या साळुंके, छाया पाटील, अॅड. अनंत जगताप, शरद शिंदे, अण्णासाहेब गडाख, गोविंद लोखंडे, छावा संघटनेचे विलास पांगारकर, मच्छिंद्र चिने, अॅड. भगीरथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजन बैठकीत सर्व पक्षांचे मराठा समाजाचे सर्वपक्षीय नेते राजकारण व गट-तट विसरुन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शनिवार, दि. २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे जास्तीत जास्त संख्येने या मूक मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस शहर व तालुक्यातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)