वर्षभरासाठी सात ठिकाणी वाहनतळ

By Admin | Updated: August 9, 2015 23:08 IST2015-08-09T23:07:30+5:302015-08-09T23:08:05+5:30

पर्वणी वगळता नियोजन : पालिकेने खासगी जागांसाठीही मागवले देकार

Parking at seven places a year | वर्षभरासाठी सात ठिकाणी वाहनतळ

वर्षभरासाठी सात ठिकाणी वाहनतळ

नाशिक : वर्षभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात विविध तिथींना मोठ्या प्रमाणात शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन महापालिकेने सात ठिकाणी अंतर्गत वाहनतळांचे नियोजन केले असून, पर्वणीकाळ वगळता ही वाहनतळे उपलब्ध राहणार आहेत. पालिकेने वाढणारी वाहतूक गृहीत धरून काही खासगी जागांवरही वाहनतळांसाठी देकार मागविले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणीकाळातील नऊ दिवसांसाठी बाहेरील वाहनांना शहरात प्रवेश बंद राहणार असून बाह्य वाहनतळांवर वाहने उभी करून भाविकांना पायी अथवा एसटी महामंडळाच्या बसने शहरात अंतर्गत वाहनतळांवर यावे लागणार आहे. मात्र, कुंभमेळा वर्षभर चालणार असल्याने वेगवेगळ्या तिथींना भाविकांची शहरात होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने शहरातील काही भागात अंतर्गत वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार महापालिकेने गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान, औरंगाबादरोडवरील निलगिरी बाग, पंचवटीतील क. का. वाघ महाविद्यालयासमोरील लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टची जागा, मुंबई नाक्यावरील हॉटेल संदीप समोरील महापालिकेच्या मालकीची जागा, गोल्फ क्लब मैदानालगतचे ईदगाह मैदान, कालिदास कलामंदिरासमोरील बी. डी. भालेकर हायस्कूल मैदान आणि म्हसरूळ रोडवरील मेरीचे मैदान याठिकाणी अंतर्गत वाहनतळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. या वाहनतळांवर भाविकांना दुचाकी, तीनचाकी तसेच हलक्या व जड वजनाची वाहने लावता येणार आहेत. सदर वाहनतळांसाठी महापालिकेने कंत्राटदारांकडून देकार मागविले आहेत. या वाहनतळांवर पर्वणीकाळात वाहने लावता येणार नाहीत. महापालिकेने वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने डोंगरे वसतिगृह मैदान, लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टची जागा तसेच मेरीचे मैदान या जागा केवळ आॅक्टोबरअखेरपर्यंत वाहनतळासाठी नियोजित केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Parking at seven places a year