पालक सक्षम, तरी संस्थेसाठी आग्रह

By Admin | Updated: June 29, 2014 00:42 IST2014-06-29T00:29:32+5:302014-06-29T00:42:46+5:30

धक्कादायक : जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न; मान्यता नसलेल्या संस्थांतही प्रवेश

Parents, however, insist on the organization | पालक सक्षम, तरी संस्थेसाठी आग्रह

पालक सक्षम, तरी संस्थेसाठी आग्रह

सुदीप गुजराथी

नाशिक
आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे पालक सर्वत्र दिसत असले, तरी काही पालक मात्र आर्थिक परिस्थिती सक्षम असूनही आपल्या पोटच्या गोळ्याला अनाथ बालकांच्या संस्थेत ठेवण्याबद्दल आग्रही असल्याचे धक्कादायक चित्र आहे. पालकांकडून संगोपनाची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असताना, यातून चिमुकल्यांचीही परवड होत आहे.
अनाथ, निराधार मुलांचा सांभाळ करण्यासाठी जिल्ह्यात असलेल्या संस्थांमध्ये आपल्या पाल्यालादेखील ठेवावे, असा आग्रह अनेक पालकांकडून होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. आई-वडील दोघे नोकरीला असूनही ते मूल सांभाळण्याची जबाबदारी घेत नसल्याचे चित्र आहे. उलट आपण पाल्याचे संगोपन करण्यास कसे अक्षम आहोत, याचेच चित्र निर्माण केले जात आहे. महिला व बालकल्याण विभागासमोर आलेल्या काही प्रकरणांतून ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने संबंधित पाल्य संस्थेत ठेवण्यासाठीचे सर्व निकष पूर्ण करीत आहे का, याची खातरजमा केली जाते; मात्र अनेकदा काही वर्षांनंतर संबंधित पालक मूल सांभाळण्यासाठी सक्षम असल्याचे समोर येते, तेव्हा त्यांना पाल्याला घरी घेऊन जाण्याची सूचना दिल्यास ते नकार देत असल्याचे चित्र आहे.
एवढेच नव्हे, आपल्या पाल्याला नाशिक शहरातीलच एखाद्या संस्थेत ठेवावे, यासाठीही ते आग्रही राहत आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर्थिक दुर्बल पालकांना ‘बालसंगोपन’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले जाते; मात्र या पालकांचा हेका कायम राहत असल्याने दिवसेंदिवस शहरातील अनाथांसाठीच्या संस्थांत बालकांची संख्या वाढतच चालली आहे.

Web Title: Parents, however, insist on the organization