पाप्या शेखने हल्लेखोरांना ओळखले
By Admin | Updated: November 22, 2014 00:20 IST2014-11-22T00:19:58+5:302014-11-22T00:20:16+5:30
न्यायालयात आरोपींची हजेरी : जिल्हा व सत्र न्यायालयात समर्थकांची प्रचंड गर्दी

पाप्या शेखने हल्लेखोरांना ओळखले
नाशिक : शिंदे-पळसेजवळील हॉटेल किरणमध्ये सराईत गुन्हेगार पाप्या शेख व त्याच्या साथीदारांवर झालेल्या गोळीबारात शेखच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ हा गोळीबार व खून खटला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असून, शुक्रवारी पाप्या शेखने रिव्हॉल्व्हर, हत्त्यारे व कपड्यांबरोबरच संशयितांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे़ सी़ शिरसाळे यांच्यासमोर ओळखले़
पाप्याची न्यायालयात साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाली असून, येत्या २७ नोव्हेंबरला या गोळीबारात जखमी झालेल्या त्याच्या दोन साथीदारांची साक्ष होणार आहे़ दरम्यान, आज जिल्हा न्यायालयात दोन्ही बाजूच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती़
या घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, सराईत गुन्हेगार पाप्या शेख पत्नी ललिता, मुलगा गणेश व साथीदार विनोद सुभाष जाधव, सुनील ज्ञानदेव लहारे यांच्यासमवेत ७ मार्च २०११ रोजी कल्याणहून शिर्डीकडे जात होता़ त्यावेळी शिंदे-पळसेजवळील हॉटेल किरण येथे तीन-चार दुचाकीवर आलेल्या दहा-बारा जणांनी गोळीबार केला़ यामध्ये पाप्याचा मुलगा सात-आठ वर्षांचा मुलगा गणेशचा गोळी लागून मृत्यू झाला, तर विनोद जाधवला गोळी लागली होती़
पाप्यावरही पाच-सहा गोळ्या झाडून हल्लेखोरांनी पुन्हा सत्तू व धारदार शस्त्राने वारही केले होते़ पाप्याच्या भावाने इतरांच्या मदतीने या सर्वांना प्रथम बिटको व नंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते़
शुक्रवारी न्यायालयात पाप्याची साक्ष व उलटतपासणी घेण्यात आली़ पाप्याने न्यायाधीशांसमोर हल्लेखोर प्रदीप सरोदे, संजय धामणे, अजय शेख, शाहरूख शेख, सागर अशोक बेग यांना ओळखले; मात्र पोलिसांनी प्रमुख आरोपी केलेला नितीन शेजवळ हा घटनेच्या वेळी नसल्याचे सांगून क्लिन चिट दिली़ याबरोबरच हल्ल्यात वापरण्यात आलेले चार रिव्हॉल्व्हर, सत्तूर, चाकू, हल्ल्यावेळचे स्वत:चे व मुलाचे कपडेही ओळखले़ २७ नोव्हेंबरला या हल्ल्यात जखमी झालेले पाप्याचे साथीदार विनोद जाधव, सुनील लहारे यांची साक्ष होणार आहे़ या दोघांपैकी एक येरवडा, तर दुसरा नाशिकरोड कारागृहात आहे़ या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड़ सुधीर कोतवाल, तर आरोपींतर्फे अॅड़ पवार व अॅड़ वाणी काम पाहत आहेत़ (प्रतिनिधी)