गोदावरी नदीपात्राला पानवेलींचा पुन्हा विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 01:03 IST2020-12-11T00:03:46+5:302020-12-11T01:03:49+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

गोदावरी नदीपात्राला पानवेलींचा पुन्हा विळखा!
चांदोरी : निफाड तालुक्यातील गोदावरी नदी पात्राला पानवेलींनी पुन्हा विळखा घातल्याने पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पानवेलींमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, जलचरांचे अस्तित्वदेखील धोक्यात आले आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
तीन ते चार वर्षांपासून नांदूरमध्येश्वर ते माडसांगवी या सुमारे ३० किलोमीटरपर्यंतच्या गोदावरी नदीपात्रात पानवेलींचे साम्राज्य पसरलेले आहे. या पानवेली नवीन चांदोरी-सायखेडा पुलाजवळ अडकून राहतात.
त्यामुळे पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाण्याचा प्रवाह संथ झाल्याने पानवेली एकाच ठिकाणी अडकून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. तसेच जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यामुळे प्रशासनाने त्या पानवेली मोकळ्या करून पुढे काढून देण्याचे काम केले; मात्र पुढे जाऊन त्या चांदोरी-सायखेडा या जुन्या पुलाला अडकल्या आहेत. या पानवेली नांदूरमध्येश्वर धरणात अडकण्याची शक्यता आहे. सदर पानवेलींची समस्या सोडविण्याची मागणी नागरिक व पर्यटकांकडून केली जात आहेत.
चांदोरी येथील गोदावरी पात्रातील पानवेलींची समस्या गंभीर असून, यासाठी पानवेली काढण्यासाठी आमदारांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- वैशाली चारोस्कर, सरपंच, चांदोरी
पानवेलीच्या समस्येमुळे नदीमधील जलचरांना धोका पोहचत असून, पाणी दूषित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन गोदावरी नदीचे पात्र पानवेलीमुक्त करावे.
- सागर गडाख, नागरिक