दहशत : नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ

By Admin | Updated: September 29, 2014 22:18 IST2014-09-29T22:17:59+5:302014-09-29T22:18:15+5:30

सिन्नर, घोटीत चोरट्यांच्या अफवा

Panic: Time to wake the citizens | दहशत : नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ

दहशत : नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ

सिन्नर : गेल्या आठवड्यापासून सिन्नर शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरट्यांच्या अफवांना पेव फुटले आहे. चोरट्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे.
गेल्या आठवड्यात येथील गावठा भागात त्यानंतर सरदवाडीजवळील वस्तीवर, झापवाडी व पास्ते येथे चोरटे आल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. तेव्हापासून या अफवांनी जोर पकडला असून, चोरट्यांची संख्या मोठी असल्याच्या अफवांनी नागरिकांवर दहशत पसरली असून, रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. अनेक तरुण रात्री गस्ती घालून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहे. परंतु ‘लांडगा आला रे आला...’ अशी स्थिती झाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहे. पोलिसांनाही रोज रात्री कोणत्या भागात चोर दिसले लवकर या, अशी विनवणी केली जात आहेत. मात्र पोलीस तेथे पोहोचल्यावर चोरटे सापडत नाहीत. अद्यापर्यंत मळहद्दी परिसरात दोघा संशयिताना पकडण्यात आले होते. त्यापूर्वी नांदूरशिंगोटे येथे एकाच रात्री पाच ठिकाणचे दुकाने फोडणाऱ्या एका संशयिताला सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र चोरट्यांनी मोठी टोळी पोलिसांनाही दिसली नसून नागरिकांनाही अशी टोळी दिसली नाही. मात्र चोरट्यांची दहशत मात्र मोठ्या प्रमाणात पसरल्याने नागरिकांवर दहशतीखाली वावरावे लागत आहे.
माळेगाव येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघे चोरटे आल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले. मात्र, त्यावेळीही पोलिसांसह नागरिकांच्या हाती काहीच लागले नाही. या अफवा असल्याने लोक जागरूक झाले असून, रात्रीच्या वेळी शहर व उपनगरांमध्ये लाठ्या, काठ्या हाती घेऊन तरुणांनी गट पाडून गस्ती सुरू केली आहे. त्यामुळे चोरटे असले तरी ते जागरूक तरुणांच्या गस्तीमुळे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे.
या चोरट्यांच्या दहशतीमुळे पास्ते, सदरवाडी येथील तरुणांनीही गस्ती वाढविली असून, रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. संशयित आढळल्यास चोप दिला जातो. त्याचा अनुभव शनिवारी रात्री नाशिक येथील तरुणांना आल्याचे समजते. पार्टी करण्यासाठी नाशिकहून पास्ते परिसरात आलेल्या तरुणांच्या दोन कार रात्री अकराच्या सुमारास
पास्ते येथील तरुणांनी अडवल्या. त्यांची चौकशी केल्यावर त्यांचे
उत्तरे थातूरमातूर आल्याने त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. त्यांना पकडून ठेवून पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर हे तरुण चोर नसून नाशिक येथील एका बँकेचे कर्मचारी असल्याचे उघडकीस आल्यावर त्यांची सुटका झाली.
घोटी : इगतपुरी तालुक्यालगतच्या अकोले तालुक्यातील नागरी वस्तीत अज्ञात चोरट्यांच्या टोळक्यांनी धुमाकूळ घालून ही चोरटी घोटीकडे वळली असल्याच्या अफवेने घोटी शहर आणि परिसरतील नागरिकांत दहशत पसरली असून, घोटी शहरातील काही भागांत या चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, यासाठी शहरातील युवक या चोरट्याचा शोधण्याचा रात्रभर जागून प्रयत्न करीत असल्याचे चित्र शहरातील सर्वच भागांत पाहण्यास मिळत आहे. दरम्यान,दोन दिवसांपासून घोटी शहरातही चोरटे आल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. इंदिरानगर, संभाजीनगर, रामरावनगर आदि परिसरात चोरांनी काही घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. याबाबत शहरातील काही युवकांनी या कथित चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटे हाती लागत नसल्याने शहरात भीतीचे प्रमाण कायम आहे.
याबाबत घोटी पोलीस यांनाही रात्री फोन येत असल्याने पोलीसही धावपळ मोहिमेत सहभागी होत आहेत. दरम्यान, शहरात महिला भयभीत झाल्या आहेत. पोलिसांनी शहरात रात्रीची गस्त वाढवावी व शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
नवरात्रोत्सव साजरा होत असताना सार्वजनिक मंडळाजवळ, पोलीस दिसत नाहीत. एवढेच नव्हे, तर वासुदेव चौक, जैन मंदिर, चौदा नंबर चौक, जनता विद्यालय या वर्दळीच्या परिसरातही पोलिसांची नेमणूक करावी,अशी मागणी शहर व परिसरात होत आहे.
घोटी शहरासह पूर्व भाग असलेल्या धामणगाव, धामनी, बेलगाव, पिंपळगाव मोर या भागामधेही चोरांची टोळी आल्याच्या चर्चेने त्या परिसराताही रात्री आठ वाजेनंतर अनोळखी इसमांना बंदी घालण्यात आली आहे. फेरीवाले बाहेरून येणारे विक्रेते यांना बंदी घालण्यात आली आहे.
घोटी शहरातही फेरीवाले
विक्रेत्यावर संशयाने पाहिले जात असून, घोटी बाहेर पाल टाकून राहत असलेल्या अनोळखी कुटुंबांना हाकलून देण्यात आले असून, राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
कथित चोरांच्या या चर्चेने शहराला हादरा बसत असून, युवक व सामाजिक कार्यकर्ते रात्रीचे जागता पहारा देत आहेत.
काही युवकांकडून व्हॉटस अपवर ‘घोटीकरांनो सावधान, रात्र चोरांची आहे’ असा सावधगिरीसाठी मेसेज दिले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Panic: Time to wake the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.