सोमेश्वर कॉलनीत भुरट्या चोरांची दहशत
By Admin | Updated: September 5, 2015 22:19 IST2015-09-05T22:18:54+5:302015-09-05T22:19:35+5:30
जागते रहो : रहिवाशांचा मध्यरात्रीपर्यंत खडा पहारा

सोमेश्वर कॉलनीत भुरट्या चोरांची दहशत
नाशिक : सातपूर येथील सोमेश्वर कॉलनी परिसरात भुरट्या चोरांनी अक्षरश: उच्छाद मांडला असून, दिवसाढवळ्या या परिसरात घरफोडीच्या घटना घडत आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली असून, मध्यरात्रीपर्यंत रहिवाशांकडून खडा पहारा दिला जात आहे.
घरफोडी, कामगारांची लूट, पेट्रोल चोरी या व अन्य स्वरूपाच्या घटना नित्यनियमाने या परिसरात घडत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ झाल्याने रहिवाशांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. कामगारांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या या परिसरातील बहुतांश नागरिक सकाळी ९ वाजताच कामानिमित्त बाहेर पडतात. बऱ्याच कुटुंबातील सर्वच सदस्य कंपन्यांमध्ये जात असल्याने घराला कुलूप लावण्याशिवाय पर्याय नसतो. याच संधीचा फायदा घेऊन परिसरातील भुरटे चोर घरफोडी करीत आहेत. तसेच रात्रीच्या वेळेसदेखील हे चोरटे बंद घरांचा शोध घेत आहेत, तर काही सोसायट्याच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींमधील पेट्रोल लंपास करीत असल्याने रहिवाशांना मध्यरात्रीपर्यंत खडा पहारा द्यावा लागत आहे. हे चोरटे धारदार शस्त्र जवळ बाळगूण चोऱ्या करीत असल्याने महिलांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)