पाळे खुर्द परिसरात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 17:57 IST2019-02-25T17:56:58+5:302019-02-25T17:57:09+5:30
पाळे खुर्द : परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शेळी, गायी फस्त केल्याने भीतीचे वातावरण आहे. पाळे खुर्द, असोली शिवारातील निंबा काशिराम देवरे यांची शेळी बिबट्याने फस्त केली.

पाळे खुर्द परिसरात बिबट्याची दहशत
पाळे खुर्द : परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शेळी, गायी फस्त केल्याने भीतीचे वातावरण आहे. पाळे खुर्द, असोली शिवारातील निंबा काशिराम देवरे यांची शेळी बिबट्याने फस्त केली. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. सदर घटनेची माहिती निंबा देवरे यांनी वनविभागाला दिली. आजपर्यंत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अथवा कुठल्याही कर्मचारी यांनी ना घटनास्थळी पाहणी केली ना कोणता पंचनामा केला. गोसराने, असोली, पाळे, बार्डे या भागात बिबट्याचा वावर वाढला असून, शेतात राहाणारे शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना वन अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागारिक सांगत आहेत. परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे तसेच या ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले आहे. यामुळे बिबट्याला लपण्याला बरीच जागा आहे. बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ दिवसासुद्धा घाबरू लागले आहेत. या ठिकाणी पिंजरा लावण्यात येऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. पाळे येथील हल्ल्याचा पंचनामा करून शेतकऱ्यास नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. बिबट्याचा वावर, प्राण्यावर हल्ला, सापडलेले बछडे आदी गंभीर बाबी असताना कनाशी वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असून, याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येते आहे. एखाद्या माणसाचा बळी गेल्यावर वनविभाग जागे होईल की काय, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.