जोगलटेंभी परिसरात बिबट्याची दहशत
By Admin | Updated: August 9, 2015 23:36 IST2015-08-09T23:35:24+5:302015-08-09T23:36:04+5:30
मुक्त संचार : एक वासरू, शेळी ठार

जोगलटेंभी परिसरात बिबट्याची दहशत
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील जोगलटेंभी शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वासरू व एक शेळी ठार झाल्याची घटना घडली. या परिसरात बिबट्याचा नियमित मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
येथील कमोद वस्तीवर भास्कर कालिदास विधाते यांचे घर आहे. राहत्या घराला लागूनच असलेल्या पडवीत विधाते यांनी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे बैलांसह गाय व वासरू बांधले होते. मध्यरात्री जनावरांच्या हंबरण्याने विधाते कुटुंबीय जागे झाले. ते घराबाहेर आले असता बिबट्याच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. मात्र, खोलवर जखमांमुळे वासराला आपले प्राण गमवावे लागले. शुक्रवारी पहाटे पुन्हा बिबट्याने याच परिसरातील साहेबराव कारभारी पिंपळे यांच्या घराकडे आपला मोर्चा वळवला.
पिंपळे यांच्या घरासमोरील पटांगणात सुमारे १५ शेळ्या दावणीला बांधल्या होत्या. त्यापैकी एक शेळी बिबट्याने उचलून नेत तिचा फडशा पाडला. जोगलटेंभी शिवारात बिबट्याचा संचार नेहमीचाच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेकांना त्याने दिवसाही दर्शन दिल्याने शेतात काम
करण्यास शेतकरी व मजूर धजावत नसल्याचे चित्र आहे. परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)