औंदाणे परिसरात बिबट्याची दहशत
By Admin | Updated: July 9, 2014 01:42 IST2014-07-09T01:42:34+5:302014-07-09T01:42:46+5:30
औंदाणे परिसरात बिबट्याची दहशत

औंदाणे परिसरात बिबट्याची दहशत
तरसाळी : कौतिकपाडे आणि औंदाणे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री साडेआठ वाजता दोन शेतकऱ्यांच्या शेतात हा बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, शेतकरी शेतातील व गावातील कामे लवकर उरकून सायंकाळी सातच्या आत घरात जात आहेत. वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
कौतिकपाडे येथील शेतकरी बाळू पवार व औंदाणे येथील प्रकाश निकम घरामध्ये असताना अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्याने या शेतकऱ्यांनी बॅटरी लावून पाहिले तर बिबट्या घरासमोरील डाळींबबागेत बसलेला दिसला. हा बिबट्या साधारणत: अंदाजे आठ वर्षांचा असावा.
या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारील शेतकरी जमा झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून ही माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी फटाक्यांचा आवाज केल्याने हा बिबट्या तिथून निघून पोल्ट्री फार्मच्या मागे लपला असता सुतळी बॉम्ब फोडले. त्यानंतर त्याने पलायन केले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतातील या बिबट्याचे पायाचे ठसे घेतले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांकडे पिंजरा लावण्याची मागणी केली.
कौतिकपाडे व औंदाणे गावाजवळ कपाळ्या डोंगर व जंगल आहे. या कपाळ्या डोंगरावरील जंगलाला काही दिवसांपूर्वी आग लागून हे जंगल जाळले होते. त्यामुळे जंगलात अन्न-पाणी नसल्याने हे बिबटे अन्न व पाण्याच्या शोधात रात्रीच्या वेळेस मनुष्यवस्तीत येऊ लागल्याने या परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)