सोनसाखळी चाेरांमुळे सिडकोवासीयांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:46+5:302021-03-04T04:26:46+5:30
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको, चुंचाळे, अंबड परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत आहे. गुन्हेगार डोके वर काढू लागल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी ...

सोनसाखळी चाेरांमुळे सिडकोवासीयांमध्ये घबराट
अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको, चुंचाळे, अंबड परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत आहे. गुन्हेगार डोके वर काढू लागल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी संशय व्यक्त केला जात आहे. अंबड पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपुष्टात आल्याचीही नागरिकांत चर्चा सुरू आहे. सिडको परिसर झपाट्याने विकसित होत असून नवीन नाशिक अशी ओळख या भागाला मिळत असताना दुसरीकडे गुन्हेगारीमध्येही वाढ होत आहे. यामुळे अंबड पोलीस ठाण्याचे सक्षमीकरण करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंबड पोलीस ठाण्याला पुरेसे पोलीस बळ पुरवून पोलीस चौक्यांमध्ये वाढ करून गस्त प्रभावी करण्याची मागणी होत आहे.
सावतानगर येथून पायी जाणाऱ्या पंचवटीमधील रहिवासी सरला दिलीप चव्हाण (५५) यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सुमारे ६० हजार रुपयांची सोनसाखळी चक्क पायी पळत आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून धूम ठोकली. ही घटना भरदिवसा दुपारी १ वाजेच्या सुमारास घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुचाकीने चोरटा पसार झाला नसला तरीदेखील तो पाेलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. घटना घडताच ‘चोर...चोर...’ असे चव्हाण या जोरजाेराने ओरडल्या. आजूबाजूचे नागरिकही त्यांच्या मदतीला धावले. काहींनी त्या चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्नही केला; मात्र चोरटा दिसून आला नाही. यावेळी १ वाजून ५० मिनिटांना या घटनेची माहिती जागरूक नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली आणि मदत पोहोचविण्याची मागणी केली.
---इन्फो---
पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ वाढला
सावतानगर येथे सोनसाखळी चोरीची घटना घडताच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्यात आली. कक्षाने माहिती बिनतारी संदेश यंत्रणेवरून अंबड पोलिसांना कळविली. यानंतर, २ वाजून ४० मिनिटांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी येथे भेट देत पुढील सूत्रे हलविल्याचा दावा करण्यात आला. या घटनेत तसेच अन्य काही आपत्कालीन मदतीचा कॉल कंट्रोल रूमला मिळाल्यानंतर पोलिसांचा गरजूंना किंवा अडचणीत असलेल्या व्यक्तींना मिळणारा प्रतिसादाचा वेळ हा अलीकडे खूप जास्त वाढल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. एक युवक रविशंकर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये दारू पिऊन येत धिंगाणा घालत जोरजोराने शिवीगाळ करत धमकावत असल्याचा ‘कॉल’ कंट्रोल रूमला रात्री तेथील महिला रहिवाशाने केला होता. या कॉलनंतर घटनास्थळावर पोलीस संपूर्ण रात्र उलटून गेली तरी पोहोचले नाही, हे विशेष!