देवपूरमध्ये ‘पांडुरंगाची’ जलसेवा
By Admin | Updated: April 24, 2016 23:35 IST2016-04-24T23:19:18+5:302016-04-24T23:35:11+5:30
उपक्रम : प्रत्येक कुटुंबाला मोफत दोनशे लिटर पाणी घरपोच देण्यास प्रारंभ

देवपूरमध्ये ‘पांडुरंगाची’ जलसेवा
देवपूर/पाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील देवपूर येथे पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची होणारी परवड थांबविण्यासाठी प्रगतिशील शेतकरी पांडुरंग सहादू जगताप यांनी मोफत जलसेवा सुरू केली आहे. जगताप यांनी स्वखर्चाने प्रत्येक कुटुंबास घरपोच दोनशे लिटर पाणी देण्यास प्रारंभ केला आहे.
सलग पाच वर्षांत देवपूर परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने यंदा दुष्काळाची दाहकता वाढली आहे. परिसरातील विहिरी कोरड्याठाक पडल्या असून, शासनाच्या वतीने पाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तथापि, तो गावासाठी अपुरा पडत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली असून, ५० रुपयांत दोनशे लिटर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन पांडुरंग जगताप, मंगला जगताप व संतोष जगताप यांनी ग्रामस्थांना मोफत पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला व लागलीच या उपक्रमास त्यांनी प्रारंभही केला आहे. विहिरीत पाणी असेपर्यंत संपूर्ण गावाला मोफत पाणीपुरवठा करण्याचा निर्धार जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
याबद्दल देवपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सुनील गडाख यांच्या हस्ते जगताप यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच मदन गोळेसर, उपसरपंच सुनीता कळंबे, तुषार गडाख, संजय गडाख, शरद गडाख, विकास गडाख, दौलत खोले, म्हाळू खोले, सुकदेव गडाख, बाळासाहेब गडाख, सुनील रानडे, चंद्रभान गडाख आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)