पांडवलेणीचे बहरले सौंदर्य

By Admin | Updated: July 31, 2016 00:47 IST2016-07-31T00:42:07+5:302016-07-31T00:47:33+5:30

पावसाळी सहली : पर्यटकांना भुरळ

Pandhalani's auspicious beauty | पांडवलेणीचे बहरले सौंदर्य

पांडवलेणीचे बहरले सौंदर्य

नाशिक : पावसामुळे शहराचे महत्त्वाचे ऐतिहासिक पर्यटनस्थळ असलेल्या त्रिरश्मी लेणीचे (पांडवलेणी) सौंदर्य अधिकच बहरले आहे. हिरवाईचे कोंदण लाभलेल्या पांडवलेणीच्या पायऱ्या चढताना जणू निसर्गाने पर्यटकांच्या स्वागतासाठी ‘ग्रीन कार्पेट’ आच्छादून ठेवले आहे की काय, असा भास न झाल्यास नवलचं! पावसाळ्यातील पांडवलेणीचे सौंदर्य डोळ्यांत साठविण्यासाठी पर्यटक सहकुटुंब मोठ्या संख्येने येथे येत आहे.रिमझिम पाऊस आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे याचे अद्भुत दृश्य पहावयास मिळते. लेणीवर हिरवळ दाटली असून, परिसरातील वृक्षराजीही बहरल्यामुळे पर्यटकांना भुरळ पडली आहे. लेणीवरील काही कुंडांमध्ये पाणी साचल्याने बेडकांचे संगीतही आलेल्या पर्यटकांच्या कानी पडत आहे.
आबालवृद्ध वीकेण्डसाठी पांडवलेणी परिसराची निवड करताना दिसून येत आहे. शनिवार, रविवार येथे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसाच्या हलक्या व मध्यम सरी अंगावर झेलत गरम-गरम मकईचे कणीस खात पर्यटक निसर्गाच्या हिरव्यागार मंडपातून पायऱ्या चढण्याचा आनंद लुटत आहे. एरवी उन्हाळ्यात लेणीच्या पायऱ्या चढताना अधिक दमछाक होते व उष्म्याचा त्रासही जाणवतो. मात्र आता थंड वातावरणात हिरवाईच्या लाभलेल्या कोंदणामुळे आल्हाददायक ट्रेक पर्यटक करत आहे. पांडवलेणीवर गेल्यानंतर शहराचे विहंगम दृश्य बघून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत. ‘आपलं नाशिक एवढं वाढलं’ असे उद्गार यावेळी सहज कानी पडतात.
चोहोबाजूंनी गर्द हिरवाईने नटलेले बुध्द स्मारक पर्यटकांच्या सेल्फी फोटोसेशनचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. लेणीच्या रेलिंगजवळ सुरक्षित उभे राहून नागरिक बुध्द स्मारकासोबत सेल्फी काढतात. २४ गुहांची मिळून ही एक लेणी आहे. अप्रतिम दगडी नक्षीकाम आणि डोंगरामध्ये कोरलेल्या गुहा हे या लेणीचे मुख्य वैशिष्ट्य. सध्या लेणी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित आहे. येथील उत्कृष्ट मूर्तीकला डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून लेणीमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रौढांकडून प्रत्येकी पंधरा रुपये शुल्क आकारले जाते.

Web Title: Pandhalani's auspicious beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.