पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: February 12, 2016 23:59 IST2016-02-12T23:59:01+5:302016-02-12T23:59:14+5:30
मांगीतुंगीत जनसागर : जैन समाजाचा नव्हे तर भारताचा गौरव

पंचकल्याणक महोत्सवास प्रारंभ
नाशिक : सटाणा तालुक्यातील जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे निर्माण करण्यात आलेल्या भगवान वृषभदेवाच्या १०८ फूट उंचीच्या भव्य मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वतोभद्र महलात पंचकल्याणक उत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ८८ देवतांना प्रसन्न करण्याबरोबरच त्यांना आवाहन व त्यांचा सन्मान करण्यासाठी अभिषेक, शांती होम, जलहोम, नित्यपूजा, यागमंडल, व नवग्रह होम आदि विधी हस्तिनापूर येथील मुख्य प्रतिष्ठाचार्य विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व नरेश शास्त्री, सतेंद्र शास्त्री, प्रदीप शास्त्री, भरत काला, सम्मेध उपाध्य आदिंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. या विधीत हजारो जैन भाविक सहभागी झाले. यादरम्यान आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांची प्रवचने झाली.
या नेत्रदीपक सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य आपणास लाभले हे जन्मोजन्मीचे पुण्य आहे. असे मत व्यक्त करीत आज झालेल्या धार्मिक विधीचे महत्त्व गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी यांनी प्रवचनातून सांगितले. देशभरातील हजारो जैन भाविकांच्या गर्दीने परिसर फुलून गेला आहे.
यानिमित्ताने आचार्य अनेकान्त सागर, गणिनी प्रमुख ज्ञानमती माताजी, आचार्य देवनंदी महाराज, आचार्य पद्मनंदी महाराज, आचार्य गुप्त नंदी महाराज, आचार्य बालाचार्य जिनसेन अदिंसह शेकडो जैन साधू-महंतांसह आचार्य, मुनी, माताजी, आर्यिका यांचे आगमन झाले आहे.
आठवडाभर चालणाऱ्या या भव्य सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातून आलेल्या हजारो जैन बांधवांबरोबरच परिसरातील जैनेतर भाविक मोठ्या प्रमाणात मांगीतुंगी येथे हजेरी लावत आहेत. अखंड पाषाणातील भगवान वृषभदेवांची मूर्ती
सर्वांसाठी आकर्षण व कुतुहलाचा विषय ठरली आहे.