पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस
By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-03T22:20:18+5:302014-09-04T00:05:57+5:30
पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस

पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस
घोटी : इगतपुरी पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक येत्या १४ सप्टेंबर रोजी होणार असल्याने सभापतिपद आदिवासी राखीव प्रवर्गासाठी निघाल्याने या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्कंठा लागून राहिली असून, हालचाली गतिमान झाल्या आहेत.
सभापती, उपसभापतिपदाच्या कार्यकालात अधिकाऱ्यांसमवेत असहकार, सभापती-उपसभापती विरोधात शेवटच्या महिनाभरात अविश्वास ठराव आदि बाबतीत वातावरण ढवळून निघाले होते. सभापतिपद महिला राखीव असल्याने उपसभापतिपदाला महत्त्व होते. त्यामुळे यावेळी आरक्षण बदलणार असल्याने तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, आज जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या दालनात इगतपुरी पंचायत समितीचे सभापतिपदाचे आरक्षण निघाले. आदिवासी प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्याने सभापती-उपसभापतिपदाबाबत पुन्हा एकदा उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सभाव्य सभापतिपदासाठी आदिवासी प्रवर्गातील गोपाळ लहांगे, अपक्ष हरिदास लोहकरे व मनसेचे लहानू हिंदोले हे दावेदार आहेत, तर विद्यमान सभापती ठकूबाई सावंत व जिजाबाई कौले यांचे भवितव्य नशिबावर अवलंबून आहे. कोणाचे नशीब उजळणार याबाबत चर्चेला वेग आला आहे. (वार्ताहर)