पंचवटी पोलिसांकडून ई पास नसलेल्या वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:15 IST2021-05-12T04:15:09+5:302021-05-12T04:15:09+5:30
पंचवटी : संपूर्ण देशभरात कोराेना संसर्ग वाढल्याने प्रशासन योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर ...

पंचवटी पोलिसांकडून ई पास नसलेल्या वाहनांवर कारवाई
पंचवटी : संपूर्ण देशभरात कोराेना संसर्ग वाढल्याने प्रशासन योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे नागरिक कोरोना नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते आहे. सोमवारी अशाच प्रकारे गंगाघाटावर चारचाकी वाहने आणून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 16 वाहन चालकांवर पंचवटी पोलिसांनी ई
पास नसल्याच्या कारणावरून कारवाई करत हजारो रुपये दंड वसूल केला आहे.
गंगाघाट या ठिकाणी विविध धार्मिक विधी तसेच दशक्रिया विधी पिंडदान करण्यासाठी परराज्य तसेच परत जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. संपूर्ण देशभरात कोरोना संसर्ग वाढल्याने नागरिकांना परजिल्ह्यात जाण्यासाठी ये- जा करण्यासाठी वाहनांना ई पास सक्तीचा करण्यात आलेला आहे. मात्र, तरीदेखील काही नागरिक ई पास नसताना बिनधास्तपणे वाहने घेऊन येतात. सोमवारी सकाळी रामकुंड परिसरात पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, सहायक पोलीस निरीक्षक सुनील कासर्ले, पोलीस हवालदार शेखर फरताळे, बाळनाथ ठाकरे, नितीन जगताप यांनी परजिल्ह्यातून आलेल्या चारचाकी वाहनांची ई पास तपासणी केली. त्यावेळी जवळपास सोळा वाहनधारक ई पास नसताना नाशिक शहरात पंचवटीत दाखल झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या वाहनधारकांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केले म्हणून कारवाई करण्यात येऊन प्रत्येक वाहनधारकाला तीन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परजिल्ह्यात जाताना शासनाने ई पास सक्तीचा केला असून पंचवटीत यापुढे विना ई पास प्रवास करताना चारचाकी वाहन आढळून आल्यास त्याच्यावर देखील दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे अशोक भगत यांनी सांगितले.