पंचवटीत घमासान, तरीही आमदारांचे बस्तान
By Admin | Updated: February 25, 2017 01:12 IST2017-02-25T01:12:40+5:302017-02-25T01:12:53+5:30
‘सानप’गिरी : कॉँग्रेस-राष्ट्रवादी नामशेष

पंचवटीत घमासान, तरीही आमदारांचे बस्तान
नाशिक : शहराध्यक्षपदासह आमदारकी भूषविणाऱ्या बाळासाहेब सानप यांच्या मतदारसंघात पंचवटी विभागात महापालिका निवडणुकीत घमासान पाहायला मिळाले. परंतु, आमदारांनी २४ पैकी तब्बल १९ जागा भाजपाच्या खात्यात टाकत आपले बस्तान आणखी घट्ट केले आणि पक्षांतर्गत विरोधकांनाही चितपट केले. पंचवटीतील यशामुळे सानपांना लालदिवा मिळो ना मिळो पण, अनेक नवख्या चेहऱ्यांना मात्र महापालिकेची पायरी चढता आली. पूर्वीपासून बालेकिल्ला राहिलेल्या भाजपाने यंदा निर्भेळ यश संपादन करत आपली पकड आणखी घट्ट केली. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या उरल्या-सुरल्या अस्तित्वाचे रामकुंडात विसर्जन करण्यात आले. महापौरांनी आपल्यासह दोन जागा मिळवत मनसेची कशीबशी इभ्रत राखण्याचा प्रयत्न केला. महापालिका निवडणुकीत पंचवटी विभागाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपाचे शहराध्यक्षपद आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे असल्याने यंदा तिकीट वाटपात त्यांचाच शब्द अंतिम होता. शिवसेनेबाबत असलेले अनुकूल वातावरण, पक्षांतर्गत विरोधकांची वाढती संख्या आणि तिकीट वाटपानंतर नाराजीचे उठलेले वादळ या साऱ्या प्रतिकूल परिस्थितीत भाजपा महापालिका निवडणुकीला सामोरी गेली. पंचवटीत २४ जागांपैकी नऊ उमेदवार हे आयात केलेले होते. त्यातील सहा उमेदवार विजयी झाले, तर तीन उमेदवारांना पराभवाचा फटका बसला. उर्वरित निवडून आलेले १३ उमेदवार हे मूळ भाजपाच्या प्रवाहातील होते. बहुसदस्यीय प्रभाग रचनेत पॅनल पद्धतीचा सर्वाधिक लाभ यंदा भाजपालाच झाला. शहरातील ८ प्रभागांमध्ये भाजपाचे पूर्ण पॅनल विजयी झाले. त्यातील तीन प्रभाग हे एकट्या पंचवटी विभागातीलच होते, तर एका प्रभागातून तीन सदस्य निवडून आलेल्या प्रभागांची संख्या दोन राहिली. पंचवटीतील सहा प्रभागांमध्ये काही लढती चुरशीच्या होत्या. त्यात काही मातब्बर आमनेसामने होते. असे असतानाही भाजपाने मातब्बरांना धूळ चारत एकहाती यश संपादन केले. मागील निवडणुकीत पंचवटी विभागात मनसेचे ७, राष्ट्रवादीचे ५, तर कॉँग्रेसचे २ नगरसेवक निवडून आले होते. यंदा भाजपापुढे राष्ट्रवादी व कॉँग्रेस दोन्ही पुरती नामशेष झाली. आघाडीचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. पंचवटीत सेनेची चलती नाही, हे यंदाही सिद्ध झाले. मागील निवडणुकीत सेनेच्या एकमेव महिला नगरसेवक निवडून आल्या होत्या. यंदाही सेनेला एकच जागा मिळाली आहे. शहरात इतरत्र अपक्षांनी सपाटून मार खाल्ला असताना निवडून आलेल्या तीन अपक्षांपैकी दोन अपक्ष पंचवटीतून निवडून आले. उपमहापौर गुरुमित बग्गा, कॉँग्रेसच्या विमल पाटील, मनसेचे उल्हास धनवटे व नंदिनी बोडके यांच्या आघाडीने सेना-भाजपाच्या नाकात दम आणला. त्यात उल्हास धनवटे वगळता इतर तिघे विजयी झाले. मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले यांचे खंदे समर्थक असलेल्या धनवटे यांचा झालेला पराभव हा स्व. उत्तमराव ढिकले यांच्या पश्चात ढिकले घराण्याच्या एकूणच राजकारणाला आव्हान देणारा ठरला आहे. विद्यमान महापौर अशोक मुर्तडक हे मनसेच्या नव्हे तर स्वत:चा जनसंपर्क व कामगिरीवर पुन्हा निवडून आले, हे मनसेसह विरोधकांनाही मान्य आहे. पंचवटीतील भाजपाच्या निर्भेळ यशाने मात्र सानप यांनी पक्षावरील आपली पकड घट्ट केली आहे.