मोकाट श्वानांचा पंचवटीत उपद्रव कायम
By Admin | Updated: October 20, 2014 00:14 IST2014-10-19T22:19:04+5:302014-10-20T00:14:13+5:30
मोकाट श्वानांचा पंचवटीत उपद्रव कायम

मोकाट श्वानांचा पंचवटीत उपद्रव कायम
पंचवटी : परिसरात विविध भागात गेल्या महिनाभरापासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपाच्या संबंधित विभागाकडे श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
श्वानांमुळे रात्रीच्या वेळी घराकडे परतणाऱ्या पादचाऱ्यांना विशेषत: दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना तर श्वान बघताच एकतर वाहने बंद करून लोटत न्यावी लागतात किंवा हातात दगड, विटांचे तुकडे घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यात ठाण मांडून बसलेले श्वान पादचारी तसेच वाहनधारक दिसल्यास थेट त्यांच्यामागे घोळक्याने भुंकतात व मागे लागतात. यामुळे अनेक वाहनधारकांची धांदल उडत असल्याने ते वेगाने वाहने नेण्याचा प्रयत्न करतात आणि वाहनासह घसरून जखमी होतात. मनपा प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून मोकाट श्वान पकडले जात असल्याचे वारंवार सांगितले जात असले तरी पकडलेले श्वान पुन्हा आहे त्याच भागात दिसून येत आहे. (वार्ताहर)