पालखेडचे पाणी थांबले
By Admin | Updated: April 16, 2016 00:32 IST2016-04-16T00:30:53+5:302016-04-16T00:32:40+5:30
गुन्हे दाखल : शेतकरी सैरभैर

पालखेडचे पाणी थांबले
नाशिक : येवला, मनमाडसाठी पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पुढील काही महिने येवला, नांदगाव तालुक्यांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मात्र डाव्या कालव्यातून पाणीचोरी करणारे शेतकरी पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे लागल्याने सैरभैर झाले आहेत.
गेल्या आठवड्यात पालखेड धरणातून पाचशे दशलक्ष घनफूट पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात आले. सुमारे ८५ किलोमीटर अंतर कापून दोन दिवसांनी पाणी येवला तालुक्यातील पाटोदा साठवण तलावापर्यंत पोहोचले, तत्पूर्वी वाटेत पाण्याची चोरी रोखण्यासाठी प्रशासन व पाटंबधारे खात्याने पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या मोहिमेत सुमारे सात हजारांहून अधिक डोंगळे उद््ध्वस्त करण्यात आले, तर राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाण्याची राखण करण्यासाठी तैनात करण्यात आले होते.
परंतु तरीही पोलिसांची पाठ फिरताच, रातोरात शेतकऱ्यांकडून कालव्यात डोंगळे टाकून पाणीचोरी केली गेली. लासलगाव, निफाड, येवला तालुका पोलिसांत अशाप्रकारे दहा गुन्हे दाखल करण्यात आले. पाण्याचा प्रश्न संवेदनशील असल्यामुळे कालव्याला पाणी असेपर्यंत पोलिसांनी सबुरीची भूमिका घेत गुन्हे दाखल असलेल्या शेतकऱ्यांना अटक केली नाही, आता मात्र धरणातून पाणी सोडणे बंद झाले असून, कालव्यातही जेमतेम पाणी वाहत आहे, अशा परिस्थितीत पोलिसांनी आता पाणीचोरी प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाले आहेत.