पालखेड, दारणातून सोडले पाणी
By Admin | Updated: July 12, 2016 23:43 IST2016-07-12T23:38:00+5:302016-07-12T23:43:42+5:30
पालखेड, दारणातून सोडले पाणी

पालखेड, दारणातून सोडले पाणी
नाशिक : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक परिसरात काहीशी विश्रांती घेतली असली तरी, पेठ व दिंडोरी या दोन तालुक्यांत दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे पालखेड धरण ओव्हरफ्लो होऊन परिणामी कादवा नदीला पूर आला आहे.
दरम्यान, दारणा व पालखेड धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नांदूरमधमेश्वरमधून दिवसभर ३० हजार क्यूसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आले. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ४७६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यात त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सुरगाणा व नाशिक या ठिकाणी पावसाचे प्रमाण सकाळपर्यंत कायम होते. नाशिक शहरात दुपारपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवली त्यानंतर मात्र उघडीप दिली. परंतु ग्रामीण भागात नाशिक वगळता जोर कायम होता. दिंडोरी तालुक्यात पालखेड धरणाच्या वरच्या बाजूला जोरदार पाऊस सुरू असल्याने साधारणत: एका तासाला पालखेड धरणात दीडशे दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याची भर पडू लागल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. सायंकाळी चार वाजता पुन्हा धरणातून पाणी सोडण्यात आले. याचवेळी मासेमारीसाठी पालखेड धरणाच्या खालच्या बाजूला गेलेले सहा मच्छीमार पुरात सापडले. त्यांच्या बचावासाठी प्रशासनाने धावपळ केली. याच पाण्यामुळे कादवा नदीला पूर आल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गो शाळेसमोर कादवा नदीत तीन ग्रामस्थ अडकल्याने त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे दारणा धरण ६७ टक्के भरले असून, दारणातून नऊ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
नऊ तासांत २७६ मिलिमीटर
जिल्ह्णातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असून, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत २७६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यात नाशिक- ११, इगतपुरी- ३३, त्र्यंबकेश्वर- ३३, दिंडोरी- ४७, पेठ- ९८, निफाड- ३, बागलाण- ६, कळवण- १०, सुरगाणा- ३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.