पावसाच्या माहेरघरीच पाण्यासाठी पायपीट
By Admin | Updated: June 8, 2016 22:35 IST2016-06-08T22:24:48+5:302016-06-08T22:35:59+5:30
पाणीटंचाई : वास्तव्य इगतपुरी तालुक्यात, पाण्यासाठी शहापूर तालुक्यात

पावसाच्या माहेरघरीच पाण्यासाठी पायपीट
घोटी : जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर व नाशिक आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईची भीषण
झळ बसत असल्याने महिलांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून पायपीट करीत चक्क ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. या वाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी
टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचा शासनाने केविलवाणा प्रयत्न केला; मात्र हे टॅँकर रस्त्याअभावी या वाड्यांपर्यंत पोहोचत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
प्रचंड पर्जन्यवृष्टी असलेल्या इगतपुरीसारख्या आदिवासी तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटर अवघड व खडतर वळणांच्या डोंगरदऱ्यांतून पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. शासनाची सर्वव्यापक उदासीनता याला जबाबदार असल्याच्या प्रतिक्रि या ग्रामस्थ देत आहे.
इगतपुरी शहराजवळून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आवळखेड हे १०० टक्के आदिवासी गाव
आहे. या गावाच्या परिसरात काराची वाडी, जांभूळवाडी, वारेवाडी, चांदवाडी व वानरवाडी या आदिवासी बांधवांच्या छोट्या वाड्या आहेत. अतिशय निसर्गरम्य आणि डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या या परिसरात पावसाळ्यात दरवर्षी सरासरी जवळपास ३००० ते ३५०० मि.मी. एवढा प्रचंड पाऊस
पडतो. मात्र पाणी येते आणि जाते. एवढा पाऊस होऊनदेखील या आदिवासी बांधवाना सध्या पिण्यालादेखील पाणी नसल्याचे भयानक वास्तव डोळ्यादेखत दिसत आहे.
या वाड्यांच्या परिसरात तीन विहिरी आहेत. त्यात एका विहिरीत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी असल्यामुळे तिचा वापर होत
नाही. एक विहीर शासनाची, तर
एक खासगी आहे.
एक गाव आणि सहा वाड्यांची तहान भागवण्यासाठी शासनामार्फत एक टॅँकर सुरू आहे. ते कधी येते त्याचे वेळापत्रक या महिलांना
माहीत नाही. टॅँकर आल्यावर ते
पाणी जवळपास शासनाच्या ७० फूट खोल विहिरीत टाकले जात आहे. त्यानंतर अतिशय तळाला असलेल्या या विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढण्याचा आणि हे पाणी घरापर्यंत नेण्याची महिला, पुरुष व लहान मुलांची होणारी कसरत हा एक थरारक अनुभव आहे.
सकाळपासून ते सायंकाळपर्यंत घरासाठी पाणी वाहून नेणे हाच या आदिवासी महिलांच्या दिनचर्येचा
भाग बनला आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या मदतीसाठी शाळा व नोकरी करून पुरुष व लहान मुलांनादेखील धावपळ करावी लागत आहे. हीच अवस्था कसारा घाटात असणाऱ्या चिंचले व खैरे या गावाची आहे. या गावांतील महिलांनाही पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी लगतच्या शहापूर तालुक्यात जावे लागत आहे.