दर नसल्याने डांगर फेकली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST2021-06-20T04:11:10+5:302021-06-20T04:11:10+5:30

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेली डांगरं कवडीमोल दरामुळे ...

Paddy thrown on the road due to lack of rates | दर नसल्याने डांगर फेकली रस्त्यावर

दर नसल्याने डांगर फेकली रस्त्यावर

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेली डांगरं कवडीमोल दरामुळे फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटणेदेखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपला ३० ते ४० क्विंटल माल फेकून दिला.

गिरीश धारस्कर यांनी फेब्रुवारी महिन्यात २० गुंठे शेतात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत मोठ्या कष्टाने डांगरांची लागवड केली होती. डांगरांतून यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा धारस्कर यांना होती. लागवड दर्जेदार होत असल्याचे बघून त्यांनी २० गुंठ्याच्या लागवडीसाठी सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता.

मार्च महिन्यात डांगरांचे उत्पादन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या डांगरांना ३५ ते ४० रुपये प्रति किलोचा भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अचानक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन होताच ३५ रुपये प्रति किलो दराने विकली जाणारी डांगरं केवळ ४ ते ५ रुपये प्रति किलो दराने विकली जाऊ लागली. एप्रिल आणि मे महिन्यात आठवडा बाजार बंद असल्याने भाजीपाला विकता येत नव्हता. धारस्कर यांनी सुमारे अडीच ते तीन महिने डांगरं साठवणूक करून सुरक्षित ठिकाणी ठेवली होती. मात्र, दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जून महिन्यात देखील कवडीमोल भाव मिळत असल्याने साठवून ठेवलेली डांगरं खराब होऊ लागल्याने धारस्कर यांनी केलेल्या भाववाढीच्या अपेक्षांचं केवळ स्वप्न राहिले. अखेर हतबल होऊन खराब झालेल्या ५० क्विंटलपैकी सुमारे ३० ते ४० क्विंटल डांगरं उकिरड्यावर टाकून देण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया गिरीश धारस्कर यांनी व्यक्त केली आहे.

-------------------------

मोठ्या अपेक्षेने मी डांगरं लावली होती. डांगरं चांगली यावीत, यासाठी ४० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. मात्र, अचानक लॉकडाऊन झाल्याने डांगराला कवडीमोल भाव मिळाल्याने यातून साधा उत्पादन खर्चदेखील फिटला नाही.

---–----- गिरीश धारस्कर, शेतकरी, पिंपळगाव लेप.

---------------

कवडीमोल दरामुळे डांगरं फेकताना शेतकरी. (१९ मानोरी २/३)

===Photopath===

190621\19nsk_20_19062021_13.jpg

===Caption===

१९ मानोरी २/३

Web Title: Paddy thrown on the road due to lack of rates