धान उत्पादक संकटात
By Admin | Updated: July 12, 2014 00:29 IST2014-07-11T22:20:26+5:302014-07-12T00:29:30+5:30
धान उत्पादक संकटात

धान उत्पादक संकटात
सुरगाणा : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी अद्याप पाऊस झालेला नाही. आदिवासी शेतकऱ्यांनी मोलमजुरी करून भाताचे महागडे बियाणे खरेदी करून भात, नागली, वरई यांची धूळपेरणी केली होती. पाऊस न झाल्यामुळे हजारो रुपयांचे भाताचे बियाणे वाया गेले आहे. त्याचप्रमाणे कृषी विभाग व पंचायत समितीतर्फे आदिवासी शेतकऱ्यांना यावर्षी भाताचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
तालुक्यात भात पिकाचे सरासरी क्षेत्र ११ हजार हेक्टर व नागलीचे ६२00 हेक्टर, वरई ५७00 हेक्टर, भुईमूग, १८00 हेक्टर, खुरसणी ३३00 हे. तूर ७५0 हेक्टर या सर्व पिकांच्या पेरण्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. भात पेरणी व लागवडीचा हंगाम संपत आला आहे. त्यामुळे पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी पश्चिम पट्टा, कळवण पश्चिम पट्टा या भागातील भात उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.
पाऊस न झाल्यामुळे या भागात पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खुंटविहीर, मालगोंदा, भदर, चिल्लारपाडा, गुही, गारमाळ, पांगारणे, चिंचपाडा, पिंपळसोंड, रानविहीर या भागात दूध उत्पादक शेतकरी असून, हजारो लिटर दूध उत्पादक आहेत. त्यांना चाराटंचाईस सामोरे जावे लागत आहे. पाऊस न झाल्यामुळे कोरडा व हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होत नाही. जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
यासाठी आदिवासींना जुने खावटी कर्ज माफ करून त्वरित नवीन खावटी कर्ज उतलब्ध करून देण्यात यावे, सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी तालुक्यात सीमेंट बंधारे, पाझर
तलाव बांधण्याची मंजुरी देण्यात यावी, शेतकऱ्यांना विहिरी, शेततळी मंजूर करावीत, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चिंतामण गावित, एन. डी. गावित, तालुका अध्यक्ष जनार्दन भोये, रमेश थोरात, गोपाळ धूम, राजू पाटील, मुरलीधर भोये, हेमराज धूम,
वसंत राठोड आदिंनी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री, जिल्हाधिकारी, आदिवासी आयुक्त, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)