ओझरखेडचे पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश
By Admin | Updated: September 14, 2015 22:13 IST2015-09-14T22:12:14+5:302015-09-14T22:13:27+5:30
निर्बंध : इंजिनच्या साह्याने पाणी उचलल्यास कायदेशीर कारवाई

ओझरखेडचे पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश
वणी : धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने सदरचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश ओझरखेड धरण जलसिंचनाच्या शाखाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून, धरणालगत जलाशय किंवा नदीच्या काठावर विद्युत मोटारी किंवा आॅइल इंजिनच्या साह्याने पाणी उचलल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याचे पत्र संबंधित घटकांना बजावण्यात आले आहे.
दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरणात अवघा आठ टक्के पाणीसाठा आहे. औद्योगिक क्षेत्र व जलसिंचन योजना यातील लाभार्थी आहेत. मात्र समाधानकारक पाऊस नसल्याने धरणातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. वणी, कृष्णगाव, चांदवड तालुक्यातील ३६ गाव पाणीपुरवठा योजनांना पिण्याचे पाणी या धरणातून देण्यात येते. दरम्यान पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक अंतर्गत ओझरखेड कालवा उपविभाग क्रमांक २ पिंपळगाव (ब.) यांच्याकडून ओझरखेड धरण शाखेच्या अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले असून, त्या अन्वये शाखाधिकाऱ्यांनी त्या घटकांना लेखीपत्र दिले आहे. दरम्यान, याबाबत आदेशाचे पालन न केल्यास महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ अन्वये पाणी उचलण्याचे साहित्य जप्त करून कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.