ओझरला विचित्र अपघात; धुळ्यातील तीन ठार
By Admin | Updated: June 9, 2014 00:50 IST2014-06-09T00:49:07+5:302014-06-09T00:50:40+5:30
दुर्घटना : मृत एकाच परिवारातील; नऊ गंभीर

ओझरला विचित्र अपघात; धुळ्यातील तीन ठार
ओझर टाऊनशिप : दुचाकी चालविणाऱ्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील एकाच परिवारातील तीन जण जागीच ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. ओझरनजीकच्या चौफुलीवर सदर दुर्घटना घडली. जखमींमध्ये सटाण्यातील नायब तहसीलदारांसह मुंबईतील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील डॉ. विनोद मदन वसावे (५०) हे आपली पत्नी डॉ. मीनाक्षी (४५) व मुलगा गौरव यांच्यासह कारने (एमएच १२ एएन-१३८०) नाशिककडे जात होते. ओझरनजीकच्या चौफुलीवर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात नाशिककडून ओझरकडे भरधाव वेगात येणारी निवृत्त न्यायमूर्ती कोचर यांची कार (एमएच ०२ सीपी ५५१२) सरळ विरुद्ध बाजूला गेली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या वसावे यांच्या कारवर आदळली.
सदर कार दुभाजकावर चढल्याने तिचे टायर फुटले आणि कार तीन-चार वेळा उलटली. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एमएच १५ बीएन २६४१ आणि एमएच १८ डब्ल्यू-८१७० या दोन्ही गाड्या वसावे यांच्या कारवर आदळल्या.त्यात या कारचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील एका बाजुची वाहतूक तासाभरासाठी विस्कळीत झाली.
या भीषण अपघातात सटाण्याचे नायब तहसिलदार संजय निंबा शिंदे (४६) व त्यांचा मुलगा अथर्व (पान २ वर)
संजय शिंदे (१०) हेही जखमी झाले. जखमींमध्ये निवृत्त न्यायमूर्ती राजन जोधराज कोचर (७३) प्रमिला रजान कोचर (६९) सीमा कपूरचंद चोपडा, दिशा कपूरचंद चोपडा (१५) चालक घनश्याम श्रीलाल चौधरी (३२) (सर्व राहणार, मालाड मुंबई), महेश मोरे व लालसिंग सुरसिंग गंभीर जखमी झाले.
सदर अपघात इतका विचित्र होता की, प्रथम दर्शनी कोणती गाडी कोणत्या गाडीवर आदळली हेही समजत नव्हते. अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश बोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अब्युलन्समधून औषधोपचारासाठी व्होकार्ट दवाखान्यात दाखल करण्यात आले. काही जखमींना नाशिकमधील लोकमान्य हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)