ऑक्सिजन प्रकल्प येत्या आठवडाभरात पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:34+5:302021-08-15T04:17:34+5:30
शनिवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी ...

ऑक्सिजन प्रकल्प येत्या आठवडाभरात पूर्ण
शनिवारी (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कोरोना सद्य:स्थितीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी भुजबळ बोलत होते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २४ ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, चालू आठवड्यात सहा प्रकल्प सुरू होतील तर तीन ठिकाणी प्रत्यक्ष सुरू झाले आहेत. येत्या आठवडाभरात ९ ते १० ठिकाणी सुरू केले जातील तर अन्य ठिकाणी यंत्रसामुग्री बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या प्रकल्पांच्या ठिकाणी विद्युत जनित्र बसविण्याच्या सूचना वीज कंपनीला देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांमुळे २८९ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची तयारी केली असून, ग्रामीण भागातील तयारी पाहता ४२६ मेट्रिक टन ऑक्सिजन साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय ऑक्सिजन वाहतुकीसाठी पाच टँकर सज्ज आहेत. या ऑक्सिजन प्रकल्पांमुळे कायमस्वरूपी व्यवस्था उभी राहत असल्याची माहितीही भुजबळ यांनी दिली.
शासनाने निर्बंध काही प्रमाणात हटविले असून, मॉल सुरू झाले आहेत. दुकानांना वेळ वाढवून देण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी २०० व्यक्तींना अथवा हॉल क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली असून, शाळांबाबत निर्णय मागे घेण्यात आला असला तरी, काेरोनामुक्त गावांमध्ये सुरू झालेल्या शाळा सुरूच राहतील, असे सांगून भुजबळ यांनी, मोठ्या प्रमाणात निर्बंध हटविण्यात आल्याने गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे लग्न समारंभामध्ये होणारी गर्दी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असून, अशा समारंभात मास्कचा वापर अनिवार्य करणे गरजेचे असून, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
*पेयजलाचे प्राधान्याने नियोजन करावे*
जिल्ह्यात पर्जन्यमानाचे अल्प प्रमाण पाहता पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच पाणी आराखड्यानुसार अभ्यास करून पाणी आवर्तन वाटपाबाबत योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
बैठकीच्या वेळी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामांची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.