ऑक्सिजन तुटवड्याने यंत्रणा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:08+5:302021-04-23T04:16:08+5:30

तालुक्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय उपचार यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करत आहे, परंतु ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठी ...

Oxygen deficiency impairs the system | ऑक्सिजन तुटवड्याने यंत्रणा हतबल

ऑक्सिजन तुटवड्याने यंत्रणा हतबल

तालुक्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय उपचार यंत्रणा पुरेपूर प्रयत्न करत आहे, परंतु ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यात अपयश येत असल्यामुळे यंत्रणा हतबल झाली आहे.

कळवण शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी अभोणा व मानूर येथे शासकीय कोविड सेंटर असून मनुष्यबळ आणि ऑक्सिजनचा तेथे तुटवडा आहे शिवाय कळवण येथे खासगी कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची सरकारी संख्या ७५० पर्यंत गेली असून वाढती संख्या बघता हे कोविड सेंटर अपुरे पडत आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना नाशिक व मालेगाव, सटाणा, वणी येथे धावाधाव करावी लागत आहे मात्र तेथेही बेड व ऑक्सिजन शिल्लक नसल्याचे सांगितले जात असल्यामुळे सर्वच मेटाकुटीला आले आहेत.

सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च करणे परवडत नाही. कुठेही बेड आणि ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने तालुक्यात घरातील कर्ते पुरुष, महिला बाधित होऊन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर मोठे संकट कोसळत आहे.

इन्फो

लहान मुले, युवकांनाही बाधा

तालुक्यातील ५५ ते ६० गावात मोठ्या प्रमाणात लहान मुले आणि युवकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून काही तरुणांचाही यामध्ये दुर्दैवाने बळी गेल्यामुळे या महामारीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

अभोणा, मानूर येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्ण प्रतीक्षा यादीत आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयातदेखील ऑक्सिजनअभावी रुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत. ऑक्सिजन मिळत नसल्याने खासगी रुग्णालय बंद करण्याच्या मनःस्थितीत आहे तर बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे बेड व ऑक्सिजन सिलिंडर बेडची संख्या वाढवणे गरजेचे झाले आहे.

इन्फो

नवीबेज पॅटर्नचे कौतुक

कळवण, अभोणा, नवीबेज, सप्तश्रुंगी गड आणि चिंचोरे येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. कळवण शहरात तसेच अभोणा, सप्तश्रुंगी गड येथे जनता कर्फ्यू पाळण्यात येऊन रुग्ण संख्या कमी करण्यात यश मिळविले. नवीबेज गावाने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब करुन कोरोनाचा अटकाव करण्यासाठी उपाययोजना केल्यामुळे केंद्रीय पथकाने दखल घेऊन नवीबेज पॅटर्नचे कौतुक केले आहे.

Web Title: Oxygen deficiency impairs the system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.