नवीन बांधकामाला परवानगी देताना ऑक्सिजन बेड अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:52 IST2021-04-27T23:41:09+5:302021-04-28T00:52:14+5:30
एकलहरे : कोरोनासारख्या महामारीचे संकट लक्षात घेता आगामी काळात नागरिकांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये म्हणून ग्रामपंचायतीत नवीन बांधकाम करणाऱ्या प्रत्येकास ऑक्सिजन बेड उभारणे बंधनकारक करण्याचा ठराव एकलहरे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे.

नवीन बांधकामाला परवानगी देताना ऑक्सिजन बेड अनिवार्य
एकलहरे : कोरोनासारख्या महामारीचे संकट लक्षात घेता आगामी काळात नागरिकांना ऑक्सिजन बेडची कमतरता भासू नये म्हणून ग्रामपंचायतीत नवीन बांधकाम करणाऱ्या प्रत्येकास ऑक्सिजन बेड उभारणे बंधनकारक करण्याचा ठराव एकलहरे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत करण्यात आला आहे.
एकलहरे ग्रामपंचायतीच्या सदस्या रत्नाबाई दिलीप सोनवणे या कोरोनाशी झुंज देत असताना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने मयत झाल्या. त्यांना या मासिक सभेत एकलहरे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मोहिनी जाधव व अन्य सदस्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. या सभेत सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांनी सूचना केली की, कोरोनावर उपाययोजना म्हणून एकलहरे ग्रामपंचायत हद्दीत नवीन बांधकाम परवानगी मागणाऱ्यांना ऑक्सिजन बेड उभारणे बंधनकारक करावे.
जे ग्रामस्थ नवीन बांधकामासोबत ऑक्सिजन बेड उभारतील त्यांना घरपट्टी करातून सूट देण्यात यावी, जेणेकरून आरोग्यसेवेला प्राधान्य मिळेल. जाधव यांनी केलेल्या सूचनेचे सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून, सूचनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मासिक सभेत ठराव करण्यात आला.
सरपंच मोहिनी जाधव यांनी ठराव बहुमताने मंजूर करून हीच स्वर्गीय रत्नाबाई सोनवणे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे सांगितले. सदर मासिक सभेला ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघ, उपसरपंच अशोक पवळे, सदस्य नीलेश धनवटे, संजय ताजनपुरे, कांताबाई पगारे, सुरेखा जाधव, शोभा वैद्य, निर्मला जावळे, सुरेश निंबाळकर, विश्वनाथ होलिन आदी उपस्थित होते.
(फोटो २७ एकलहरे)-
एकलहरे ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत कोरोनामुळे दिवंगत सदस्या रत्नाबाई सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करतांना सरपंच मोहिनी जाधव, अशोक पवळे, सुरेश वाघ व ग्रामपंचायत सदस्य.