महापालिकेची मासिक महासभा शुक्रवारी (दि. १८) ऑनलाईन पध्दतीने पार पडली. यावेळी महापौरांनी सध्याची खोदकामे थांबवण्याचे तसेच शहराच्या विविध भागातील गॅस कंपनीने खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत, असे आदेशही दिले.
महासभेच्या प्रारंभीच भाजपचे संभाजी मोरूस्कर यांनी सभेत शहरातील खाेदकामाविषयीचा प्रश्न उपस्थित केला. संपूर्ण शहर खोदून ठेवल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप केला. याचवेळी शाहू खैरे यांनी मेनरोड, धुमाळ पॉईंट, एनटी पटेल रोड अशा सर्वच ठिकाणी खोदकाम केल्याने नाशिककरांना बाहेर कसे पडावे असा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप केला. गावठाण भागात स्मार्ट सिटी, तर बाहेर महापालिकेचे खोदकाम, अशा कचाट्यात गावठाणातील नागरिक अडकल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच स्मार्ट सिटी कंपनी बरखास्त करण्याचा अधिकार कायद्याने देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीच बरखास्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गुरुमित बग्गा यांनी नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली नऊ कोटींची वाळू स्मार्ट सिटी कंपनीने विकल्याचा आरोप केला. तसेच विकास कामांसाठी या कंपनीकडे पडून असलेले शंभर कोटी रुपये परत घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतल्यानंतर कंपनीचे सीईओ रक्कम देणार नाही, असे जाहीररित्या सांगतात. हा महापौर तसेच सभागृहाचा अवमान असल्याने कंपनी बरखास्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शहरातील गॅस कंपनीच्या रस्ते खोदकामाविषयी शहर अभियंता संजय घुगे यांनी खुलासा करताना, गॅस कंपनीला २०५ किलोमीटर रस्ते खोदकामाची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील ७९ किलोमीटरचे खोदकाम झाले असून कंपनीकडून ७८ कोटी २३ लाख रुपये डॅमेज चार्जेस घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच रस्त्याच्या कडेला केलेल्या खोदकामाच्या ठिकाणी खडीकरण सुरू करण्यात आल्याचे सांगितले.
शहर अभियंत्याच्या खुलाशामुळे नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांना निलंबित करण्याची मागणी खैरे यांनी केली. त्यातच स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी या बैठकीस उपस्थित नसल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. महापौरांनी कंपनीच्या विषयावर स्वतंत्र महासभा बोलावण्याचे जाहीर केले, मात्र विकास कामे होत नाहीत, त्यातच खोदकाम, यामुळे नगरसेवकांनी महासभा तहकूब करण्याची मागणी केली. परंतु महापौरांनी कामकाज सुरूच ठेवल्याने गजानन शेलार आणि अन्य काही नगरसेवकांनी, प्रशासनाला पाठीशी घालणाऱ्या महापौरांचा धिक्कार असो... अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे महापौरांनी महासभा तहकूब केली.
चर्चेत विलास शिंदे, सलीम शेख, रत्नमाला राणे, सुनील गोडसे, भागवत आरोटे यांनी सहभाग घेतला.
...इन्फो...
मोरूस्कर यांचा घरचा आहेर...
महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे होत नसल्याने संभाजी मोरूस्कर यांनी महासभेत नाराजी व्यक्त केली. आपलीच सत्ता असून कामे होत नसतील तर उपयोग काय, अधिकाऱ्यांनी कामे हेाणार नाहीत असे सांगावे, म्हणजे नागरिकांना तसे सांगू. परंतु नागरिकांशी प्रतारणा करता येणार नसल्याने आंदोलन करण्यात ये्ईल, असे त्यांनी महापौरांना सांगितले.
इन्फो..
अंदाजपत्रकच रखडले, बोरस्ते यांचा आरोप
महापालिकेचे अंदाजपत्रक मे महिन्यात मंजूर झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सत्तारूढ भाजपाने पाठविला नाही. मग कामे कशी होणार, असा प्रश्न विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर कामे होणार नसतील तर काय उपयाेग, असा प्रश्न त्यांनी केला.