शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा कडेलोट
By Admin | Updated: November 21, 2015 23:14 IST2015-11-21T23:10:31+5:302015-11-21T23:14:50+5:30
पोलिसांचा लाठीमार : पालक मंत्र्यांच्या वाहनाला घेराव; मराठवाड्याला पाणी सोडल्याने संताप

शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा कडेलोट
नाशिक : गंगापूर, दारणा धरणांमधून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी व राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये खदखदत असलेल्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. या उदे्रकाला पालकमंत्री गिरीश महाजन यांना शनिवारी (दि.२१) सामोरे जावे लागले. आंदोलकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमून महाजन यांना काळे झेंडे दाखविले. तसेच जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे वाहन कार्यालयाबाहेर रस्त्यावरच रोखून धरले.मराठवाड्याच्या दुष्काळ निवारणासाठी दारणा, गंगापूर धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यापासून शहरासह जिल्ह्यात पाणीप्रश्न ‘पेटला’ आहे. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये व शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली असून, शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी महाजन उपस्थित राहणार असल्याने शेतकरी, कॉँगे्रस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाजन यांना घेराव घालण्याच्या तयारीसाठी ठिय्या आंदोलन करत जमले होते.
दुपारी २ वाजेच्या सुमारास पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच आंदोलनकर्त्यांनी धाव घेऊन महाजन यांच्या वाहनाभोवती घेराव घातला अन् ताफा रोखून धरला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची आंदोलनकर्त्यांना आवरण्यासाठी एकच धावपळ उडाली. एकीकडे काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांकडून रोखले जात होते, तर दुसरीकडे आंदोलनकर्ते महाजन यांच्या वाहनाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते.यामुळे आंदोलन उग्र स्वरूपाचे झाले आणि परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे बघून अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दंगल नियंत्रण पथकाला ‘चार्ज’ घेण्याचे आदेश देत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सुरू केलेल्या लाठीमारामुळे सर्वत्र पळापळ झाल्याने तणावाचे वातावरण पसरले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री व सहकारमंत्री दादा भुसे यांना वाहनातून उतरवत सुरक्षा कडे करून बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित आणले. पालकमंत्री कार्यालयाच्या आवारात येताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हिरवळीवर बसलेले सर्व शेतकरी व कार्यकर्ते उठून उभे राहिले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे पुन्हा आंदोलन आणि पोलीस ‘आमने-सामने’ आले. यावेळी पालकमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो फोल ठरला आणि अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात महाजन, भुसे, आमदार सानप हे नियोजन भवनाकडे रवाना झाले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या हालचाली सुरू होत असताना भवनाबाहेर कार्यकर्ते व शेतकऱ्यांची घोषणाबाजी व गोंधळ सुरूच होता. ‘पालकमंत्र्यांना बाहेर बोलवा..,’ ‘नेत्यांशी काय चर्चा करतात जनतेशी चर्चा करा...’ अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरल्याने अखेर पोलीस आयुक्त यांनी हातात माईक घेत पालकमंत्र्यांना चर्चेसाठी बाहेर बोलविले असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व संतप्त शेतकरी शांत झाले. सव्वातीन वाजेच्या सुमारास महाजन, भुसे, जिल्हाधिकारी कुशवाह हे सभागृहातून बाहेर आले आणि जमलेल्या आंदोलक ांशी महाजन यांनी प्रथम संवाद साधण्याचा प्रयत्न करताच संतप्त आंदोलकांनी पुन्हा सरकारविरोधी घोषणांचा भडीमार सुरू केल्याने महाजन पुरते संतापले. यावेळी पोलीस व आंदोलकांच्या नेत्यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी पालकमंत्री म्हणाले, मी या जिल्ह्याचा पालकमंत्री असून जिल्ह्याची पालकत्वाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी सर्व नाशिककरांना पाणी उपलब्ध करून देणार असून जलसंपदा खातेदेखील माझ्याकडेच आहे. त्यामुळे कोणीही गोंधळ घालून राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. यावेळी ‘राजकारण’ तुमच्याकडून केले जात असल्याचाही ‘आवाज’ जमलेल्या शेतकऱ्यांमधून बुलंद झाला आणि या आवाजाला अनुमोदनदेखील तितक्याच उत्साहाने जमावाने दिले. त्यामुळे महाजन यांनी माईक बंद करून पुन्हा सभागृहाचा उंबरा ओलांडला.
यावेळी पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, उपआयुक्त विजय पाटील, अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा परिसरात होता.
रस्त्यावरच पालकमंत्र्यांना रोखले
सकाळी साडेअकरा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला हजेरी लावणार असल्याने त्यांचा निषेध व घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडून त्यांची ‘वाट’ अडविली होती. दुपारी २ वाजेच्या दरम्यान पालमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा आवाज कानी पडताच सर्व आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि ताफा प्रवेशद्वारापासून लांब रोखण्यात यश मिळविले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली.