११४ कोटींपैकी बांधकामांचा खर्च ३८ कोटी, दोन हजार कामे अपूर्ण
By Admin | Updated: September 7, 2016 01:14 IST2016-09-07T01:13:47+5:302016-09-07T01:14:05+5:30
८५५ कामेच झाली पूर्ण : एक हजार रस्त्यांची कामे प्रगतीत

११४ कोटींपैकी बांधकामांचा खर्च ३८ कोटी, दोन हजार कामे अपूर्ण
नाशिक : जिल्हा परिषदेला सन २०१५-१६ अंतर्गत एकूण विविध प्रकारची बांधकामे, रस्ते व मोऱ्यांची बांधकामे करण्यासाठी प्राप्त झालेल्या एकूण ११४ कोटी ७९ लाखांपैकी ३८ कोटी ६३ लाखांचा खर्च झाल्याचे वृत्त आहे. विविध प्रकारच्या २८८८ कामांपैकी ८५५ कामे पूर्ण, तर २०३३ कामे प्रगतीत असल्याचे समजते. या २०३३ प्रगतीत असलेल्या कामांमध्ये सर्वाधिक प्रगतीतील कामे आदिवासी उपयोजनेतील रस्ते व पुलांच्या कामांची संख्या १००० इतकी असल्याचे वृत्त आहे.
जिल्हा परिषदेला विशेष रस्ते दुरुस्तीसाठी चार कोटी ६७ लाख १८ हजारांचा निधी प्राप्त असून, त्यापैकी दोन कोटी ११ लाखांचा निधी ९९ कामांवर झाला आहे. या निधीतील २२५ कामांपैकी १२६ कामे अद्याप प्रगतीत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याअंतर्गत प्राप्त झालेल्या तीन कोटी ११ लाखांच्या निधीपैकी एक कोटी ५१ लाखांचा निधी ११ कामांवर झाला असून, या निधीतील १२ पैकी एक काम प्रगतीत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून बिगर आदिवासी भागातील रस्ते व पुलांसाठी नऊ कोटी २६ लाखांच्या निधीपैकी चार कोटी ३३ लाखांचा निधी ७३ कामांवर खर्च झाला असून, १४५ कामांपैकी ७२ कामे प्रगतीत आहेत. तीच बाब आदिवासी भागातील रस्ते व पुलांसाठी ५७ कोटी ६३ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी १५ कोटी ६३ लाखांचा निधी १३३ कामांवर झाला आहे.
एकूण ११३३ कामांपैकी १००० कामे प्रगतीत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासकीय इमारती बांधकामांसाठी चार कोटी ६० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, त्यापैकी दोन कोटी ३१ लाखांचा निधी दोन कामांवर खर्च झाला आहे. चार कामे अद्याप प्रगतीत आहेत. (प्रतिनिधी)