शहरात १०४५ विद्यार्थी शाळाबाह्य
By Admin | Updated: July 5, 2015 23:40 IST2015-07-05T23:39:49+5:302015-07-05T23:40:16+5:30
सर्वेक्षणातील निष्कर्ष : नाशिकची वाटचाल संपूर्ण साक्षरतेकडे

शहरात १०४५ विद्यार्थी शाळाबाह्य
नाशिक : राज्य शासनाच्या आदेशानुसार शनिवारी सुमारे चार हजार शिक्षक आणि स्वयंसेवकांनी राबविलेल्या मोहिमेत १०४५ शाळाबाह्य विद्यार्थी सापडल्याने नाशिक लवकरच शंभर टक्के साक्षर ठरेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. मोहिमेचा हेतू नि:संशय चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शनिवारी संपूर्ण शहरात हजारो शिक्षकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले. स्लम भागांमध्ये मात्र शाळेला दांडी मारणाऱ्या मुलांचा प्रश्न आढळला. अनेक ठिकाणी मुले घरीच नसल्याने त्यांची आणि सर्वेक्षणाला आलेल्या शिक्षकांची भेटच झाली नाही. एकीकडे स्लम भागातील विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असताना दुसरीकडे भीक मागणारी मुले आणि भटकंती करून जगणाऱ्या कुटुंबातील मुलांचा सर्व्हे झाला की नाही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नव्हती.
उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या अनेक कुटुंबातील मुलांची परिस्थिती सर्वांना ज्ञातच आहे. त्यातील एकही मुलगा शाळेत जात नाही. सिग्नलवर भीक मागून अथवा फुलांचे गजरे विकून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना राहण्याचेच ठिकाण नसल्याने ते आसरा मिळेल तेथे संसार थाटतात. त्यामुळे या मुलांपर्यंत सर्वेक्षक पोहोचले की नाही हादेखील प्रश्न आहे.
सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये किमान लाखभर कुटुंबे तरी स्लम भागात राहात असताना १०४५ शाळाबाह्य मुले सापडावीत हे नाशिकच्या साक्षरतेसाठी चांगले लक्षण आहे. परंतु ज्या काही ठरावीक ठिकाणी मुले शाळाबाह्य आढळली तेथे मुलांपेक्षा पालकांच्याच प्रबोधनाची जास्त गरज असल्याचे दिसून आले.
हा प्रयत्न आणखी काही वेळा राबवल्यास नाशिकसारखी
अनेक शहरे शंभर टक्के साक्षर होण्यास निश्चितच मदत होईल. (प्रतिनिधी)