पुष्पवृष्टीत जमले ‘तुमचे-आमचे’

By Admin | Updated: September 13, 2015 23:12 IST2015-09-13T23:11:21+5:302015-09-13T23:12:11+5:30

शाहीपर्वणी : महापौर-सभापतींचा अवखळपणा

'Our-Ours' gathered in the flora | पुष्पवृष्टीत जमले ‘तुमचे-आमचे’

पुष्पवृष्टीत जमले ‘तुमचे-आमचे’

नाशिक : एखाद्या संस्थेने कार्यक्रम घेतला की, एका पदाधिकाऱ्याला प्रास्ताविक करायला सांगितले जाते, तर दुसऱ्याला सूत्रसंचालन करायला लावून समान संधी देण्याची कसरत पार पाडली जाते. सिंहस्थ कुंभपर्वानिमित्त अशीच समान संधी महापौर आणि स्थायी समितीचे सभापती यांनी एकमेकांना सांभाळून घेत साधू-महंतांवर करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीबाबत साधली. पुष्पवृष्टी करताना दोहोंमधील अवखळपणाही जागृत झाल्याचे भाविकांनी अनुभवले.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण सोहळ्याच्या वेळी पुरोहित संघाने महापौरांसह महापालिकेतील पदाधिकारी-नगरसेवकांना दिलेल्या अवमानकारक वागणुकीचे पडसाद उमटले होते. महासभेतही त्याबाबत पुरोहित संघासह भाजपावर प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने या अपमानाचा वचपा काढण्यासाठी साधू-महंतांच्या आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याचे यजमानपद स्वीकारले आणि कार्यक्रमात आपला मान मिरवून घेतला. शाहीपर्वणीच्यावेळी पुरोहित संघ अथवा भाजपेयींना श्रेय मिळू नये म्हणून महापालिकेने गोदावरी मंदिरावर खास मंडप टाकून घेतला आणि दोन्ही पर्वणीप्रसंगी या मंडपात मनपातील सत्ताधारी मनसेसह राष्ट्रवादी, कॉँग्रेस यांचेच पुढारी दिसून आले. प्रामुख्याने पालकमंत्र्यांसह आमदार व भाजपेयींनी मंडपात हाताची घडी घालून बसण्याऐवजी रामकुंडावर गोमुखाजवळ माध्यमांसमोर झळकणे पसंत केले.
पहिल्या पर्वणीला महापालिकेमार्फत महापौरांनी रामकुंडात स्नानासाठी येणाऱ्या साधू-महंतांच्या माथ्यावर पुष्पवृष्टीचे कर्तव्य पार पाडले होते. मात्र, दुसऱ्या पर्वणीदरम्यान बहुधा समान संधीवरून काही तरी बिनसले असावे म्हणूनच की काय स्थायी समिती सभापतींसाठी थेट गोमुखाजवळच पुष्पवृष्टीसाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.

Web Title: 'Our-Ours' gathered in the flora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.