जागतिक शांतता परिषदेचे आयोजन
By Admin | Updated: October 23, 2016 00:05 IST2016-10-23T00:05:11+5:302016-10-23T00:05:41+5:30
एसएमआरके महाविद्यालय : राज्यपालांच्या हस्ते होणार उद्घाटन

जागतिक शांतता परिषदेचे आयोजन
नाशिक : दहशतवादाचा फटका संपूर्ण जगाला बसत असताना शिक्षणातून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ एज्युकेटर्स फॉर वर्ल्ड पिस (आयएईडब्ल्यूपी) आणि गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक शांतता परिषदे’चे एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार (दि. २४) ते बुधवार
(दि. २६) या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार असल्याची माहिती शनिवारी (दि. २२) महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या संकल्पनेवर ही परिषद आधारित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या परिषदेत भारतासह अमेरिका, तैवान, नागालॅण्ड आदि ठिकाणाहून येणाऱ्या तज्ज्ञांद्वारे मांडण्यात येणाऱ्या विचारांतून विश्वशांतीच्या प्रयत्नांना बळ मिळेल, असा विश्वास यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी यांनी पत्रकार परिषदे दरम्यान व्यक्त केला.
संयुक्त राष्ट्रांचा वर्धापन दिन, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची १५१ वी जयंती, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवपूर्व २५ महिन्यांच्या कालखंडाचा शुभारंभ आणि ‘डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान सोहळा अशा घटनांचे औचित्य साधून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सुशासन आणि अहिंसेसाठी शांतता शिक्षण’ या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेवर, परिषदेचे विशेष अतिथी राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार चिंतामण वनगा हेदेखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, डॉ. विवेक बोबडे, प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, प्रा. छाया लोखंडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)