मजूर संघाच्या अध्यक्षपदासाठी सोेमवारी बैठकीचे आयोजन ?
By Admin | Updated: August 1, 2015 00:13 IST2015-08-01T00:08:08+5:302015-08-01T00:13:55+5:30
मजूर संघाच्या अध्यक्षपदासाठी सोेमवारी बैठकीचे आयोजन ?

मजूर संघाच्या अध्यक्षपदासाठी सोेमवारी बैठकीचे आयोजन ?
नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच इच्छुकांना धुमारे फुटू लागले असून, पुढील आठवड्यात सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी येत्या सोमवारी (दि.३) जिल्हा मजूर संघाच्या सभागृहात अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.
जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली असून, येत्या १० आॅगस्टला ती मजूर संघाच्या सहकार भवनात होणार आहे. विद्यमान अध्यक्ष राजाराम खेमनार व उपाध्यक्ष म्हसू कापसे यांनी आठ ते दहा दिवसांपूर्वीच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजीनामा दिला होता. तो संचालक मंडळाने मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविला होता. सहकार निवडणूक प्राधिकरणाने या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा राजीनामा मंजूर करून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी १० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता निवडणूक घेण्याचे निर्देश सहकार खात्याला दिले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका उपनिबंधक गोपाळ मावळे हे काम पाहणार आहे. गेल्या पावणे दोन वर्षांपासून राजाराम खेमनार हे मजूर संघाच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत होते. आता मजूर संघाच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची मुदत संपल्याने मजूर संघाची निवडणूक होणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना केवळ तीन महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असल्याने सुरुवातीला या निवडणुकीसाठी चुरस नव्हती. मात्र काल परवाच सहकार विभागाच्या निवडणुकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याबाबतच्या अध्यादेशामुळे आता नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना एक वर्षाचा कार्यकाळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)