नाशिक सायकलिस्टतर्फे ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:17 IST2017-09-14T01:14:51+5:302017-09-14T01:17:11+5:30

नाशिक सायकलिस्टतर्फे ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन
नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्यातर्फे आगामी नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर ‘नवरात्र सायकल वारी’चे आयोजन करण्यात आले असून, या वारी दरम्यान जिल्ह्यातील विविध शक्तिपीठांना भेटी देण्यात येणार आहे.
गुरुवारपासून (दि. २१) सुरू होणाºया शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवी मंदिरासह जिल्ह्यातील भगूर, कोटमगाव, वणी, चांदवड आदी ठिकाणी सायकलवरून प्रवास करून आदिशक्तींचे दर्शन घेतले जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (दि. २२) पहिली वारी भगूर येथील रेणुका देवी मंदिर, शनिवारी (दि. २३) वणी येथील सप्तशृंगी देवी संस्थान, रविवार (दि.२४) श्रीक्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा, मंगळवारी (दि. २६) चांदवड येथील रेणुका देवी संस्थान आदी ठिकाणी भेटी देण्यात येणार आहे. दरम्यान चांदवड, मालेगाव, सिन्नर, सायखेडा, येवला, पिंपळगाव येथील सायकलिस्ट्सही या नवरात्र सायकल वारीमध्ये सहभाग नोंदविणार आहेत. जास्तीत जास्त नाशिककरांनी या नवरात्र वारीमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांनी केले आहे.