भाजपात संघटनात्मक बदलाचे वेध

By Admin | Updated: March 11, 2015 00:11 IST2015-03-11T00:10:56+5:302015-03-11T00:11:10+5:30

शहराध्यक्षासाठी चुरस : मार्चअखेर सभासद नोंदणीसाठी इच्छुकांची धावपळ

Organizational change in BJP | भाजपात संघटनात्मक बदलाचे वेध

भाजपात संघटनात्मक बदलाचे वेध

नाशिक : विधानसभा निवडणुकीत शहरातील नाशिकरोड-देवळाली वगळता तीनही मतदारसंघांवर कब्जा करत वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या भाजपात आता संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले असून, शहराध्यक्षपदासाठी चुरस बघायला मिळणार आहे. दरम्यान, मार्चअखेरपर्यंत अधिकाधिक सभासद नोंदणीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू असून, त्यानंतर वॉर्ड व मंडलनिहाय निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे.
केंद्र आणि राज्यामध्ये भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्याने भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. भाजपात सध्या सभासद नोंदणीची मोहीम सुरू असून, मार्चनंतर वॉर्डप्रमुख व मंडलप्रमुखांच्या निवडणुकींचा कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी निवडणूक रंगणार आहे.
नाशिक शहर भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्या चार वर्षांपासून लक्ष्मण सावजी यांच्या खांद्यावर आहे. २०१२ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष्मण सावजी यांच्या शहराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भाजपाने शिवसेनेशी असलेली युती तोडत ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता. त्यात भाजपाने स्वबळावर १४ नगरसेवक निवडून आणले होते. विधानसभा निवडणुकीतही मोदी लाटेत शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत भाजपाचे तीन आमदार निवडून आले. केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार आल्याने साहजिकच भाजपात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता भाजपात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटनात्मक बदलाचे वेध लागले असून, प्रामुख्याने शहराध्यक्षपदासाठी चुरस बघायला मिळणार आहे. विद्यमान शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्या कारकिर्दीत भाजपाने लक्षणीय यश संपादन केले असले, तरी त्यांच्या एकाधिकारशाहीबाबतही पक्षांतर्गत असंतोषाचे स्फोट निवडणुकीच्या काळात बघायला मिळाले
होते.
लक्ष्मण सावजी यांनी दोन टर्म अध्यक्षपद भूषविले असल्याने आता भाजपात नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा यापूर्वी दीर्घकाळ शहराध्यक्षपद भूषविणारे विजय साने, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, संभाजी मोरुस्कर, उत्तम उगले, कैलास अहिरे, सुनील केदार, गोपाळ पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, इच्छुकांमधील काही पदाधिकारी हे प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी भूषवित असल्याने त्यांना शहराध्यक्षपदासाठी विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Organizational change in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.