वाहने जमा करण्याचे आदेश
By Admin | Updated: January 6, 2017 01:00 IST2017-01-06T01:00:06+5:302017-01-06T01:00:21+5:30
पदवीधर निवडणूक : जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू

वाहने जमा करण्याचे आदेश
नाशिक : नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना त्यांची सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी (दि. ५) यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक पत्र काढून सामान्य प्रशासन विभागाला आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली सरकारी वाहने तत्काळ जमा करून त्यांना पुरविण्यात आलेली दूरध्वनी सेवाही खंडित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, कृषी व पशुसंवर्धन केदा अहेर यांच्याकडे सरकारी वाहने असून, त्यांना सर्वांना वाहने जमा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र काढून दिल्या आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत मात्र एकही वाहन जमा झाले नसल्याचे चित्र होते. तसेच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषदेतील कोनशिला झाकण्यात आल्या आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या दूरध्वनी सेवा खंडित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे समजते. आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधींची वर्दळ कमी झाल्याचे चित्र होते. सायंकाळी मात्र उपाध्यक्ष प्रकाश वडजे त्यांच्या खासगी वाहनाने जिल्हा परिषदेत आले. तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे, माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, माजी सभापती हिरामण खोसकर, निवृत्ती जाधव, सुनील वाजे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)