गुजरातच्या कंपनीलाच सौर पथदीप पुरवठ्याचे आदेश?
By Admin | Updated: November 16, 2015 22:21 IST2015-11-16T22:21:05+5:302015-11-16T22:21:43+5:30
मार्ग मोकळा : आठवडाभरात होणार खरेदी

गुजरातच्या कंपनीलाच सौर पथदीप पुरवठ्याचे आदेश?
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची तीन कोटींची सौर पथदीप खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून, प्रशासनाने गुजरातस्थित कंपनीला यासंदर्भात सौर पथदीप पुरवठा देण्याबाबतचे आदेश देण्याची कार्यवाही सुरू केल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी (दि.१७) यासंदर्भात नियमानुसार संबंधित कंपनीस कृषी विभागाच्या सौर ऊर्जा विभागामार्फत सौर पथदीप पुरविण्याचे आदेश काढण्यात येणार असल्याचे समजते.
पहिल्यांदा राजस्थान येथील एका कंपनीस सौर पथदीप पुरविण्याचा ठेका देण्यात आल्यानंतर या कंपनीने वेळेत पुरवठा न केल्याने त्या कंपनीचा ठेका रद्द करण्यात येऊन दुसऱ्यांदा ई-निविदा पद्धतीने सौर पथदीपांसाठी कार्यवाही करण्यात आली होती. त्यानुसार गुजरातस्थित एका सौर ऊर्जा पुरविणाऱ्या कंपनीने नियोजित अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा तब्बल २८ टक्केकमी दराने निविदा भरल्याने या कंपनीला नियमानुसार सौर पथदीप पुरविण्याचा ठेका देणे अपेक्षित असताना स्थायी समितीच्या सभेत इतक्या कमी दराने निविदा भरल्याने सौर पथदीपांची गुणवत्ता व दर्जा राहणार नसल्याचे कारण देत हा ठेका रद्द करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
प्रत्यक्षात नंतर असा ठराव स्थायी समितीला करता येत नसल्याचे निदर्शनास येताच स्थायी समितीच्या इतिवृत्तातून हा ठराव वगळण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत तर याच विषयावरून रणकंदन झाले होते. अखेर प्रशासनाने सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार कार्यवाही सुरू केली असून, त्यानुसार गुजरातस्थित कंपनीलाच सौर पथदीप पुरवठा करण्याचे आदेश देण्याची कार्यवाही सुरू केली असून, आठवडाभरातच ही खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)