‘त्या’ आश्रमशाळेची कुंडली मागवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:23+5:302021-09-19T04:16:23+5:30
तालुक्यातील आवळखेडे येथे महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करत सदर शिक्षणसंस्थाचालकाने शाळेला मान्यता असल्याचे भासवत नोकरभरतीचा घाट घातला होता. परंतु घोटी ...

‘त्या’ आश्रमशाळेची कुंडली मागवली
तालुक्यातील आवळखेडे येथे महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करत सदर शिक्षणसंस्थाचालकाने शाळेला मान्यता असल्याचे भासवत नोकरभरतीचा घाट घातला होता. परंतु घोटी कृउबाचे उपसभापती गोरख बोडके यांच्या लक्षात सदर प्रकार आल्यानंतर त्यांनी संस्थाचालकाला जाब विचारला होता. त्यानंतर संस्थाचालकाने कोरोनाचे कारण दर्शवत सदर भरतीप्रक्रिया थांबवली होती. दरम्यान, ठरलेल्या दिवशी मुलाखतीला आलेल्या तरुणांचा भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी संस्थाचालक गोपाळ मधुकर पवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. शनिवारी (दि.१८) समाज कल्याण विभागाशी पोलिसांनी पत्रव्यवहार केला असून, सदर संस्था मान्यताप्राप्त आहे काय, ती अधिकृत आहे काय? सदर संस्थेला नोकरीभरती करण्याकरिता आपण पत्र दिले होते का आदी प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत. तसेच समाज कल्याण विभाग आयुक्तांशी चर्चा करून कसून चौकशी करणार असल्याचे इगतपुरी पोलिसांनी सांगितले. शनिवार-रविवार असल्याकारणाने शासकीय कार्यालयाला सुटी आहे. त्यामुळे सोमवारी माहिती मिळणार असून, त्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.