दलितवस्तीसाठी जनगणनेनुसार बृहत आराखडे पाठविण्याचे आदेश
By Admin | Updated: May 27, 2014 01:10 IST2014-05-27T01:02:05+5:302014-05-27T01:10:00+5:30
समाजकल्याण समिती बैठकीतील निर्णय

दलितवस्तीसाठी जनगणनेनुसार बृहत आराखडे पाठविण्याचे आदेश
समाजकल्याण समिती बैठकीतील निर्णय
नाशिक : चालू आर्थिक वर्षात राबविण्यात येणार्या योजनांपैकी दलित वस्ती योजनेची कामे करताना सन २०११ च्या जनगणनेनुसार बृहत आराखडे ३१ मे २०१४ अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवावेत, असे आदेश सभापती राजेश नवाळे यांनी दिले.
समाजकल्याण समितीची मासिक बैठक राजेश नवाळे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात येणार्या योजनांचा सविस्तर आढावा राजेश नवाळे यांनी घेतला. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे ही योजना यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व उपस्थित पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायतीचे दलित वस्ती असलेल्या सन २०११ च्या जनगणनेनुसारच बृहत आराखडे ३१ मे २०१४ अखेर जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना सभापती राजेश नवाळे यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील १५ टक्के मागासवर्गीयांकरिता खर्च व पंचायत समिती स्तरासाठी २० टक्के सेस यासंदर्भात वेळोवेळी बैठकीत माहिती सादर करण्याचे विस्तार अधिकारी (स.क.) यांना सूचित करण्यात आले. समाजकल्याण विभागातर्फे आचारसंहितेच्या काळात समाजकल्याण विभागाच्या शिल्लक असलेल्या साहित्याचे त्वरित वाटप करण्यात यावे, अशा सूचनाही नवाळे यांनी दिल्या. या बैठकीस सदस्य सुभाष गांगुर्डे, बंडू गांगुर्डे, साईनाथ मोरे, शीतल कडाळे, निर्मला गिते, अर्जुन मेंगाळ, शिवांगी पवार, कुसुम अहिरे, स्वाती ठाकरे, इंदूबाई गवळी आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)