परस्पर चाचणी करणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:15 IST2021-04-23T04:15:50+5:302021-04-23T04:15:50+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांशी सलग दुसऱ्या दिवशी संवाद साधला. त्यात ...

परस्पर चाचणी करणाऱ्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश
मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांशी सलग दुसऱ्या दिवशी संवाद साधला. त्यात नाशिक (६६), दिंडोरी (१२१), सुरगाणा (६१), सिन्नर (११४), इगतपुरी (९६), त्र्यंबकेश्वर (८६), पेठ (७३) ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. या वेळी गावातील परिस्थिती, सद्य:स्थितीत उपचार घेत असलेले रुग्ण, संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था याबद्दल माहिती देत गावात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात कसा आणला याबद्दल अनुभव सांगितले. आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांची माहिती ही तत्काळ मिळते; परंतु काही नागरिक हे कोरोना टेस्ट न करता खाजगी डायग्नोस्टिक सेंटर्सकडून एचआरसिटी रिपोर्ट करीत उपचार घेतात. त्यामुळे अशा रुग्णांची माहिती ग्रामपंचायतीस मिळत नाही, असे सांगण्यात आले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना खाजगी डायग्नोस्टिक सेंटर्सकडून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एचआरसिटी टेस्ट करण्यात येऊ नये त्याचबरोबर अशा डायग्नोस्टिक सेंटरवर त्यांच्या पातळीवर आरटीपीसीआर तपासणी केंद्र हेदेखील सुरू करण्यात यावे, असे पत्रक काढण्याचे निर्देश दिले.
हगणदारीमुक्त गाव, तंटामुक्त गाव या योजनांसारखीच ‘कोरोनामुक्त गाव’ ही विशेष मोहीम गावपातळीवर राबविण्याचे आवाहन बनसोड यांनी केले. पुढील काळात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा या संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी वापराव्यात, असे ग्रामसेवकांना आदेशित करण्यात आले. त्याचबरोबर कोमॉर्बिट वृद्ध नागरिकांना गृह विलगीकरणात न ठेवता कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे. जेणेकरून अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवता येईल. येत्या दहा दिवसांत ज्या ग्रामपंचायतींमध्ये कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसेल अशा ग्रामपंचायतींना स्वत: भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेण्याचे संकेतही बनसोड यांनी या वेळी दिले.
चौकट====
सरपंचांच्या तक्रारीची तत्काळ दखल
या संवादात येवला तालुक्यातील रहाडी या गावातील सरपंच जया संजय रोकडे यांनी गावातील दुकानदार हे कोरोना चाचणी करीत नाहीत, अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली. यावर येवल्याचे गट विकास अधिकारी उमेश देशमुख यांनी तत्काळ भेट देत गावातील सर्व (सहा) दुकानदारांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या.
(फोटो २२ झेडपी)