रानवड कारखान्याची थकबाकी देण्याचे आदेश
By Admin | Updated: September 15, 2015 23:04 IST2015-09-15T23:03:46+5:302015-09-15T23:04:27+5:30
संभाजी राजे उद्योग समूहाला न्यायालयाचा दणका

रानवड कारखान्याची थकबाकी देण्याचे आदेश
निफाड : रानवड सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतलेल्या छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगसमूहाने कारखान्याचे ३० आॅगस्ट २०१५ पर्यंतचे ५ कोटी ८३ लाख रुपयांचे थकीत भाडे एका महिन्याच्या आत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने उद्योगसमूहाचे विठ्ठलराव उंबरवाडीकर यांना दिल्याची माहिती रासाका कामगार युनियनचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली आहे.
तीन वर्षांपासून रानवड साखर कारखाना संभाजी राजे उद्योगसमूहाने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे; मात्र कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने कोणतेही नियम पाळले नाहीत.
या कारखान्याचे अवसायक व कामगारांनी कारखान्याचे थकीत भाडे व पगाराची थकीत रक्कम मिळावी, यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात उद्योगसमूहाने कारखान्याची थकबाकी द्यावी,असा निकालही न्यायालयाने दिला होता. संभाजी राजे उद्योगसमूहाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर उद्योगसमूहाने कारखान्याचे थकीत भाडे एका महिन्यात द्यावे व त्यानंतर अपील दाखल करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.
संभाजी राजे उद्योगसमूहाने रासकचे भाड्यापोटी ७ कोटी ५० लाख रुपये थकविले आहे, तर हंगामी कामगारांचा बैठा भत्ता एक कोटी ५० लाख व कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचे ९० लाख रुपये तसेच कायम कामगार पतसंस्था व हंगामी कायम कामगार पतसंस्था यांचे एकत्रित ५० लाख अशी सर्व रक्कम या उद्योगसमूहाने कामगारांच्या वेतनातून कपात केली आहे; मात्र ही रक्कम संबंधित खात्यात वर्ग केली नाही. तसेच ५ महिन्यांपासून कामगारांचे पगारही थकविले असून, उपदान (ग्रॅज्युटी) ६७ लाख असे एकूण १३ कोटी ५० लाख रुपये या उद्योगसमूहाकडे थकीत आहे.
यापैकी भाड्यापोटी कारखान्याचे ३० आॅगस्ट २०१५ पर्यंतचे ५ कोटी ८३ लाख रुपये त्वरित देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उद्योगसमूहाला चांगलीच चपराक बसली आहे. (वार्ताहर)