खावटी योजनेसाठी पूर्तता करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:15+5:302021-09-02T04:29:15+5:30
निफाड : तालुक्यात ज्या आदिवासी बांधवांनी खावटी अनुदान योजनेसाठी फॉर्म दिले भरून दिले ...

खावटी योजनेसाठी पूर्तता करण्याचे आदेश
निफाड : तालुक्यात ज्या आदिवासी बांधवांनी खावटी अनुदान योजनेसाठी फॉर्म दिले भरून दिले आहेत, परंतु तांत्रिक कारणास्तव त्यांचे फॉर्म मंजूर झालेले नाहीत, अशा आदिवासी बांधवांच्या नावाची यादी तयार करून, त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तातडीने सर्व पूर्तता करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाऊ शेलार यांनी या प्रश्नी मागणी केली होती. निफाड तालुक्यातील आदिवासी बांधवांना खावटी अनुदान योजनेनुसार किट वाटप कार्यक्रम सुरू झालेला असताना, त्यावेळेस अनेक पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे फॉर्म भरूनही त्यांची नावे या यादीत आलेली नव्हती. निफाड तालुक्यात आतापर्यंत या योजनेनुसार जे किट वाटप झाले, त्यामध्ये साधारणपणे तांत्रिक कारणामुळे फॉर्म नामंजूर झालेले १,१०० आदिवासी बांधव या योजनेपासून वंचित राहिले होते. तालुक्यामध्ये बहुसंख्य आदिवासी बांधवांना जमिनी नाहीत आणि या कोरोनाच्या परिस्थितीत रोजगारही कमी झालेला आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही योजना देणे अतिशय गरजेचे होते. फॉर्म भरूनही या योजनेचा लाभ न मिळाल्याने आदिवासी बांधवांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याबाबत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाभाऊ शेलार यांनी याबाबत तातडीने राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी, पालकमंत्री छगन भुजबळ, नाशिकचे जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकारी यांना निवेदन पाठवून, ज्यांनी या योजनेसाठी फॉर्म दिले भरून दिले आहेत व तांत्रिक कारणास्तव फॉर्म मंजूर झालेले नाहीत, अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी केली होती. आदिवासी विकास विभागाने या मागणीची दखल घेत, सदर आदिवासी बांधवांच्या नावाची यादी तयार करून, त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तातडीने सर्व पूर्तता करण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाने दिले असल्याचे राजाभाऊ शेलार यांनी सांगितले.