नाशिक : रुग्णालयात उपलब्ध बेड संख्येनुसार आवश्यक असणारा ऑक्सिजन साठा व त्यासोबत अतिरिक्त दोन दिवस पुरेल एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन साठवण क्षमता राहील, असे नियोजन करण्याचे आदेश मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिले.
नाशिक महानगरपालिका हद्दीतील ५० बेड क्षमतेपेक्षा जास्त क्षमता असलेल्या खासगी रुग्णालयांची बैठक मनपा मुख्यालयात घेण्यात आली. एप्रिल व मे महिन्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी भविष्यात निर्माण होऊ नयेत, यासाठी पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या वतीने शहरातील ऑक्सिजन साठवण क्षमता व निर्मिती क्षमता वाढविण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या होत्या. या सूचनेनुसार सर्व खासगी रुग्णालयांनी स्वतःचे रुग्णालयात उपलब्ध बेड संख्येनुसार आवश्यक लागणारा ऑक्सिजन साठा व त्यासोबत अतिरिक्त दोन दिवस पुरेल एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन साठवण क्षमता करण्याबाबत आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना या बैठकीत दिल्या.
सर्वप्रथम सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी चांगल्या पद्धतीने साथरोग लाट हाताळण्यात यश प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून अभिनंदन केले. शासन निर्देशाप्रमाणे येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येतील, अशी शक्यता लक्षात घेता खासगी रुग्णालयांमध्ये यापेक्षा अजून किती अतिरिक्त खाटा राखीव करण्यात येतील, याबाबत आढावा घेतलेला आहे व त्यानुसार रुग्णालयांनी पुढील आठ दिवसात त्यांचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. त्यानुसार सर्व खासगी रुग्णालयांनी शासकीय रुग्णालयांप्रमाणेच ऑक्सिजन साठवण क्षमता तातडीने वाढविणे व त्याबाबत नियोजन करणे व केलेले नियोजन नाशिक महानगरपालिकेस कळविणे. या सर्वांमधून येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या
लाटेमध्ये नाशिकमधील नागरिकांना पुरेशी व दर्जेदार ऑक्सिजन सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत शेटे आदी उपस्थित होते.