दिंडोरीचे लाचखोर बीडीओ अखेर निलंबित पाच महिन्यांनंतर निघाले आदेश
By Admin | Updated: April 4, 2015 01:15 IST2015-04-04T01:13:28+5:302015-04-04T01:15:30+5:30
दिंडोरीचे लाचखोर बीडीओ अखेर निलंबित पाच महिन्यांनंतर निघाले आदेश

दिंडोरीचे लाचखोर बीडीओ अखेर निलंबित पाच महिन्यांनंतर निघाले आदेश
नाशिक : दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ग्रामसेवकाकडून ४० हजारांची लाच घेताना पाच महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले दिंडोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टी. झेड. मोहिते यांचे घटनेनंतर आता पाच महिन्यांनी निलंबनाचे आदेश शासनाने काढले आहेत. गुरुवारीच (दि.२) हे आदेश गटविकास अधिकारी टी. झेड. मोहिते यांना बजावण्यात आले. करंजवणचे ग्रामसेवक अरुण अहेर यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल करण्यासाठी गटविकास अधिकारी टी. झेड. मोहिते लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार मागील वर्षी २७ आॅक्टोबर रोजी दिवाळीच्या धामधुमीत तक्रारदार यांच्याकडून ४० हजारांची लाच स्वीकारताना टी. झेड. मोहिते यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. घटनेनंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाच स्वीकारताना सापडलेल्या सर्वच कर्मचारी व अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार राज्यभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सापडलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आला होता. लाच प्रकरणाला चार महिन्यांचा कालावधी उलटल्याने मोहिते यांच्यावरील निलंबनाची कारवाई टळण्याची शक्यता गृहीत धरून दिंडोरी तालुक्यातील एका लोकप्रतिनिधीने त्यांना पुन्हा दिंडोरीची सूत्रे घेण्याबाबत पत्र देण्याचीही तयारी सुरू केल्याची चर्चा होती. मात्र, आता पाच महिन्यांनंतर का होईना, दिंडोरी गटविकास अधिकारी टी. झेड. मोहिते यांच्यावरही पाच महिन्यांनंतर आता निलंबनाचा बडगा उगारण्यात आला असून, त्यानुसार मोहिते यांना निलंबनाचे आदेश गुरुवारी (दि.२) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने बजावले आहेत. विशेष म्हणजे टी. झेड. मोहिते यांच्यावर यापूर्वीही अहमदनगर जिल्'ात निलंबनाची कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)