लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : गोदावरी नदीला शुक्रवारी (दि.१४) आलेल्या पूरसदृश परिस्थितीची पाहणी करून पंचवटी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने यांनी मनपा अधिकाऱ्यांसह रामकुंड, भाजीबाजार पटांगण, गाडगे महाराज पटांगण, परिसराचा पाहणी दौरा करून हेवी रेनच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी पावसाने उघडीप घेतल्याने सभापती माने यांनी दौरा करून अधिकाऱ्यांना परिसरातील नाल्यांची सफाई, रस्ते स्वच्छता, रस्त्यावर साचलेला चिखल तत्काळ स्वच्छ करण्याची सूचना केली. शुक्रवारी सकाळी पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रामकुंड ते गाडगे महाराज पटांगण असा पाहणी दौरादरम्यान माने यांनी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन तक्रारी जाणून घेतल्या व मनपा अधिकाऱ्यांना त्या सोडविण्याबाबत सूचना दिल्या. या पाहणी दौऱ्यात पंचवटी विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी, बांधकाम विभागाचे अधिकारी नितीन पाटील, पी. एम. निकम, धनंजय माने, आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.सभापतींना टाळल्याचा आरोप शनिवारी सकाळी सुरुवातीला महापौर रंजना भानसी यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत गंगाघाट परिसराचा पाहणी दौरा केला. पाहणी दौरा करताना प्रभाग समिती सभापती या नात्याने पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतींना बोलाविणे गरजेचे होते, मात्र पाहणी दौऱ्याबाबत महापौर तसेच मनपा प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप सभापती प्रियंका माने यांनी केल्याने भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गंगाघाट स्वच्छ करण्याचे आदेश
By admin | Updated: July 16, 2017 00:03 IST