शिवाजी उद्यानातील शौचालयाला विरोध
By Admin | Updated: October 10, 2015 22:37 IST2015-10-10T22:36:15+5:302015-10-10T22:37:04+5:30
शिवाजी उद्यानातील शौचालयाला विरोध

शिवाजी उद्यानातील शौचालयाला विरोध
नाशिक : महापालिकेच्या वतीने शिवाजी उद्यानाच्या मागील बाजूस सुलभ सार्वजनिक शौचालय निर्मितीचे काम सुरू आहे. या बांधकामाला परिसरातील व्यापारीवर्गाने आक्षेप घेतला आहे.
शिवाजी उद्यान हे शहरातील सर्वांत जुने उद्यान आहे. महापालिकेने या उद्यानाचा विकास करण्याकडे लक्ष देण्याऐवजी थेट उद्यानाच्या मागील बाजूस शौचालयाच्या बांधकामाला प्रारंभ केल्याने तीव्र संताप व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. सीबीएस बसस्थानक, शालिमार बस थांबा या ठिकाणी अवघ्या दोनशे मीटरच्या अंतरावर सार्वजनिक शौचालय असतानादेखील उद्यानात शौचालय उभारणीचा घाट कशासाठी घातला जात आहे? असा प्रश्न व्यापारीवर्गाने उपस्थित केला आहे. या शौचालयाचा नागरिकांना कमी आणि अन्य भटक्या, मद्यपी व नशेबाजांनाच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे शौचालय उभारणीचे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी करत विजय पाटील, राजेश हिराणी, रोहन रॉय, अॅड. वैभव शेटे, कैलास शाह, शेखर जोशी, भारत देहलानी यांनी दुपारी शौचालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी येऊन निषेध व्यक्त केला. (प्रतिनिधी)