सिन्नर बसस्थानकाजवळ मद्यविक्री दुकानास विरोध
By Admin | Updated: July 26, 2014 00:51 IST2014-07-25T22:30:12+5:302014-07-26T00:51:26+5:30
सिन्नर बसस्थानकाजवळ मद्यविक्री दुकानास विरोध

सिन्नर बसस्थानकाजवळ मद्यविक्री दुकानास विरोध
सिन्नर : शहरातील नाशिक - पुणे महामार्गावरील व्यापारी संकुलात नव्याने सुरू होणारे मद्यविक्री दुकान येथे सुरू करण्यास परिसरातील रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. नाशिक जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने या दुकानास मंजुरी देऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पक्ष, नाशिक वर्कर्स युनियन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक राजेंद्र आवडे यांना नाशिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस हरिभाऊ तांबे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला तालुकाध्यक्ष समता श्रीमाळी यांच्या वतीने देण्यात आले आहे. येथील पवार व्यापारी संकुलात नव्याने मद्य विक्री दुकान सुरू होणार असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्याने त्यांनी तीव्र विरोध केला आहे. बसस्थानकाच्या परिसरात नव्याने मद्यविक्री दुकानास परवाना देऊ नये अशी मागणी या पक्षांच्या वतीने करण्यात आली आहे. येथे महिला, शाळकरी मुले व नागरिकांची वर्दळ असते. तसेच शेजारी नागरी वस्ती असल्याने अशा ठिकाणी मद्यविक्री करण्यास परवाना दिल्यास परिसरातील वातावरण अशांततेचे ठरू शकेल. येथून नाशिक-पुणे महामार्ग जात आहे. शेजारी स्वस्त धान्य दुकान, बँका, खासगी क्लासेस, विविध कार्यालये व व्यवसाय सुरू आहे. मद्यविक्री करणाऱ्या दुकानामुळे मद्यपींची या भागात वर्दळ वाढणार असल्याने त्याचा नकळत परिणाम होणार आहे. त्यामुळे भविष्यातील परिणाम टाळण्यासाठी व वातावरण कलुषित होऊ नये साठी येथे सुरू होणाऱ्या मद्यविक्री दुकानास शासनाच्या वतीने परवाना देऊ नये, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनांचे प्रतिनिधी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (वार्ताहर)