गोविंदनगरमधील उद्यानाचे आरक्षण उठविण्यास विरोध
By Admin | Updated: August 4, 2015 00:17 IST2015-08-04T00:17:05+5:302015-08-04T00:17:53+5:30
एकमेव आरक्षण : सहसंचालकांना निवेदन

गोविंदनगरमधील उद्यानाचे आरक्षण उठविण्यास विरोध
नाशिक : गोविंदनगर परिसरातील सर्व्हे नंबर ७७७ व ७८५ पैकी जागेतील आरक्षण क्रमांक ३५८ क मधील सुमारे २० एकर जागा उद्यानासाठी आरक्षित असताना प्रारूप विकास आराखड्यात सदर आरक्षण उठविण्यात येऊन क्षेत्र रहिवासी भागात समाविष्ट करण्यास महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता व सेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी विरोध दर्शविला असून, त्यासंबंधी नगररचनाचे सहसंचालकांना निवेदन सादर केले आहे.
सुधाकर बडगुजर यांनी याबाबत हरकत घेतली असून त्यात म्हटले आहे, नाशिक शिवारातील सर्व्हे नंबर ७५८ ते ८०४ ते ९५५ या सर्व्हे नंबर अंतर्गत सिडको वसाहतीला लागून एकूण ३१७ हेक्टर (७९२ एकर) एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाकरिता १९९३ च्या विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक ३५८ क ही जागा उद्यानासाठी आरक्षित करण्यात आलेली होती. सदर भागात हे एकमेव आरक्षण होते. परिसरातील संपूर्ण क्षेत्रफळाचा विकास झालेला असताना सदर आरक्षित जागेत उद्यान विकसित करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार महापालिकेकडे भूसंपादनाचा प्रस्तावही कार्यरत होता. मात्र, प्रारूप सुधारित विकास आराखड्यात सदर उद्यानाचे आरक्षण रद्द करून ती जागा रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे. सदर आरक्षण उठविण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. आरक्षण उठविण्याची ही कृती संभ्रमावस्था निर्माण करणारी असल्याचे बडगुजर यांनी म्हटले आहे. यावेळी सहायक संचालक किशोर पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. पंकज देवरे, डॉ. विनोद चौधरी, डॉ. गिरीश औताडे, डॉ. मिलिंद पिंपरीकर, डॉ. सतीश पाटील, डॉ. राजेश सोनवणे, संतोष हरगोडे, धनंजय बुचडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)